आरओ फिल्टर मधून वाया जाणऱ्या पाण्याचा असा करा उपयोग


पिण्याचे पाणी थेट नळातून पिण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. अनेक कारणांनी पिण्याचे पाणी दुषित होऊ लागल्याने पाणी शुद्ध करून न पिण्याने अनेक तऱ्हेच्या व्याधी उद्भविण्याचा धोका उद्भवू लागला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध करण्याच्या अनेक पद्धतींचा वापर घरोघरी होत असतो. काही दशकांपूर्वी पिण्याचे पाणी उकळून घेणे, किंवा बाजारातील स्टीलचा पिंपवजा फिल्टर घरामध्ये आणून त्याद्वारे पाणी शुद्ध करवून त्याचा वापर केला जात असे. कालांतराने जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतसे अत्याधुनिक फिल्टरेशन सिस्टम्स बाजारामध्ये उपलब्ध होऊ लागल्या. ह्या पैकीच एक फिल्टरेशन सिस्टम म्हणजे ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ किंवा आर ओ प्रक्रियेद्वारे पिण्याचे पाणी शुद्ध करणारा फिल्टर. ह्या फिल्टरमुळे पाण्यातील मातीचे कण फिल्टर होऊन पाण्याची चवही चांगली लागते. त्यामुळे अनेक मिनिटे गॅसवर पाणी उकळत ठेवण्याचा त्रास आपोआपच कमी झाला.

आर ओ फिल्टर मध्ये असलेल्या मेम्ब्रेनमुळे पाण्याचे शुद्धीकरण होत असते. तसेच ह्या प्रक्रियेच्या दरम्यान त्यातील फिल्टर साफ करण्यास अतिरिक्त पाण्याचा वापर केला जातो. फिल्टर साफ करण्यासाठी वापरले गलेले हे अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जात असते. मात्र ह्या अतिरिक्त पाण्याचे प्रमाण, शुद्ध झालेल्या पाण्यापेक्षा अधिक असते. म्हणजे साधारण एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी तीन लिटर पाणी बाहेर टाकले जाते. तसेच ह्या फिल्टरमध्ये पाण्याचे शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया धीम्या गतीने होत असताना, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जात असते. अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असताना इतके पाणी वाया जाऊ देणे योग्य नसल्यामुळे, आर ओ फिल्टरमधील अतिरिक्त पाणी पिण्यासाठी योग्य नसले, तरी अन्य किती तरी कामांसाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो.

हे पाणी साठवून ठेऊन ह्याचा वापर स्वयंपाकघरातील भांडी धुण्यासाठी, किंवा लादी पुसण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच आपल्या घरातील गाडी धुण्यासाठी देखील ह्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. झाडांना पाणी घालण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. पण तत्पूर्वी पाण्याची चाचणी करवून घेऊन ते पाणी झाडांसाठी योग्य असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरातील बाथरूम्स किंवा बाल्कनी धुण्यासाठी ह्या पाण्याचा वापर करता येऊ शकतो. मात्र केस धुण्यासाठी किंवा स्नानासाठी ह्या पाण्याचा वापर आवर्जून टाळायला हवा.