खरोखरच पाहण्याजोगा ‘संजू’


आज बॉक्स ऑफिसवर राजकुमार हिराणींचा ‘संजू’ हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे, एक म्हणजे रणबीरचा दमदार अभिनय आणि दुसरे म्हणजे संजय दत्तचे वादग्रस्त आयुष्य. एक गोष्ट चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होते, ती म्हणजे चित्रपटात संजयच्या आयुष्याशी निगडीत सत्य घटना तर आहेत, पण कथेला थोडी कल्पनेची जोड देण्यात आली आहे. म्हणजेच चित्रपटात गरजेनुसार पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत. हिराणी यांनी चित्रपटात संजय दत्तची (टाडा केस वगळता) रिअल लाइफ स्टोरी पडद्यावर साकारण्याचा पुर्ण प्रयत्न केला आहे. हिराणी यांनी स्क्रिनवर अनेक ठिकाणी इमोशन्स उत्तमरित्या दाखवले आहेत, पण काही ठिकाणी निराशादेखील होते. उदाहरणार्थ मुंबई बॉम्ब ब्लास्टची घटना ते सफाईदारपणे पडद्यावर आणू शकले नाहीत.

दरम्यान दिग्दर्शक राजकुमार हिराणींच्या संजू या चित्रपटाची कहाणी सुरु होते, तेव्हापासून जेव्हा संजय दत्त (रणबीर कपूर) ला पाच वर्षांची शिक्षा सुनावली जाते. तो त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारी प्रसिद्ध लेखिका विनी (अनुष्का शर्मा) ला भेटतो आणि स्वतःची कहाणी सांगणे सुरु करतो. सुनील दत्त (परेश रावल) आणि नर्गिस (मनीषा कोइराला) त्यांचा मुलगा संजूला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात. संजू त्याच्या आईवडिलांपासून अनेक गोष्टी लपवत असतो. याचदरम्यान नर्गिस आजारी पडतात. संजू त्याचा डेब्यू चित्रपट ‘रॉकी’च्या शूटिंगला सुरुवात करतो. ड्रग्सचे व्यसन सुटावे म्हणून त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवले जाणे, मुंबई बॉम्ब स्फोटात नाव येणे, अनेकदा तुरुंगवारी करणे, हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याशिवाय संजूच्या आयुष्यात आणखी काय काय झाले, कशाप्रकारे त्याचा मित्र कमलेश (विक्की कौशल), पत्नी मान्यता (दीया मिर्झा) त्याच्या पाठीशी उभे राहिले, संजय ड्रग्सच्या आहारी कसा गेला, त्याचे अनेक महिलांशी खरंच संबध होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात आहेत. संजय दत्तचे ३७ वर्षांचे आयुष्य अडीच तासांच्या चित्रपटात रणबीर हुबेहुब जगला आहे.

संजूच्या व्यक्तिरेखाला रणबीर कपूरने शंभर टक्के न्याय दिला आहे. चित्रपट बघताना संजय आणि रणबीर एकच आहेत, असा भास होतो. जेवढ्याही अभिनेत्री चित्रपटात आहेत, त्या केवळ शोपीस वाटल्या आहेत. परेश रावल आणि मनीषा कोइराला यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. रणबीरच्या तोडीस तोड अभिनय चित्रपटात विक्की कौशलने केला आहे. इंटर्व्हलपूर्वी संजय ड्रग्सच्या आहारी गेल्याचे दाखवण्यात आले आहे. इंटर्व्हलनंतर संजयचा तुरुंगातील प्रवास प्रेक्षकांना बांधून ठेवतो.

म्हणूनच हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. कारण यात एका स्टारच्या खासगी आयुष्याचे सत्य तर आहेत, सोबतच यात रणबीरने साकारलेला संजूही लक्षात राहणारा आहे. प्रेक्षकांना हसवण्यासोबतच रणबीर काही ठिकाणी रडवत देखील आहे. जिम सर्भला बघणे एक वेगळा अनुभव ठरतो. त्याला पडद्यावर बघताना कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ शकतो. चित्रपटात त्याने संजयचा पहिला मित्र जुबिन मिस्त्रीची भूमिका साकारली आहे. संजयला त्यानेच ड्रग्स आणि दारुचे व्यसन लावले होते. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन आणि चित्रपटाचे संगीत, स्क्रिनप्ले उत्तम आहे.