अश्या प्रकारे ‘एसी’चा वापर केल्यास वीज बिल राहील नियंत्रणात


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विजेचे बिल नेहेमी येते त्यापेक्षा किती तरी जास्त येणे स्वाभाविक आहे, कारण ह्या दिवसांमध्ये वातानुकूलन यंत्रणा, म्हणजेच एसीचा वापर वाढलेला असतो. पण आपला एसी अठरा अंश तापमानावर चालविण्यापेक्षा जर तो चोवीस अंश तापमानावर चालविला गेला, तर आपल्या वीजबिलाच्या रकमेमध्ये त्यामुळे नक्कीच फरक पडू शकतो. एरव्ही उन्हाळ्यामध्ये एसीच्या वापराने जितके वीजबिल येते, त्यापेक्षा तीस टक्के कमी बिल, एसी जास्त तापमानाच्या सेटिंगवर वापरल्यानंतर येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता एसी बनविणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या वतीने ग्राहकांना ही माहिती आवर्जून दिली जाण्याबद्दल सरकारच्या वतीने आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार एसी वापरताना घरांमध्ये तसेच ऑफिसेस आणि इतर कमर्शियल ठिकाणी, चोवीस अंश तापमान हे ‘डीफॉल्ट’ सेटिंग ठेवण्याबद्दल नियम बनविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

जर हे नवीन धोरण अंमलात आणले गेले, तर त्यामुळे दरवर्षी वीस बिलियन युनिट्स इतक्या विजेची बचत करता येणे शक्य होणार आहे. पण एसीचे तापमान जास्त ठेवल्याने वीज कमी वापरली जाते का, हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. आपण एसीचे तापमान अठरा अंशांवर केले तर आपली खोली लवकर थंड होईल असा आपला समज असतो. मात्र ही समजूत चुकीची आहे. एसीचे तापमान अठरा अंशांवर असो, किंवा चोवीस अंशांवर असो, आपली खोली गार होण्यासाठी वेळ एकसारखाच लागतो असे तद्न्यांचे मत आहे. अठरा अंशांचे तापमान असल्यामुळे खोली जास्त गार मात्र होईल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की एसीचे तापमान जितके कमी अंशांवर सेट केलेले असेल, तितका एसीचा कॉम्प्रेसर जास्त वेळ कार्यरत राहणार, त्यामुळे विजेचा वापरही जास्त होणार. त्या उलट एसीचे तापमान जर जास्त सेट केलेले असेल, तर कॉम्प्रेसर कमी काळ कार्यरत राहील आणि त्यामुळे वीजही कमी खर्च होईल. आपण सेट केलेल्या तापमानावर एसी पोहोचला, की कॉम्प्रेसर बंद होऊन केवळ एसीचा पंखा काम करतो. त्यानंतर तापमान परत वाढू लागले, की कॉम्प्रेसर पुन्हा सुरु होतो, अशी एसीची कार्यपद्धती असते.

एकापेक्षा जास्त एसी एका खोलीमध्ये असतील, तर त्या सर्वांचेच तापमान जास्त सेट केलेले असावे. त्यामुळे एसींचे कॉम्प्रेसर सतत चालत न राहता, वीजेचा अतिरिक्त वापर टाळता येतो. साधारण २९ अंशांपर्यंतचे तापमान आपल्यासाठी आरामदायक ठरू शकते. त्यामुळे एसीचे तापमान चोवीस अंश किंवा त्याहीपेक्षा जास्त ठेवल्याने विजेचा वापर कमी होऊन विजेचे बिलही कमी येईल.

Leave a Comment