शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय


आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये उद्भवू पाहणाऱ्या निरनिराळ्या संक्रमणांपासून आपला बचाव करीत असते. तसेच रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर अनेक विकार, अॅलर्जी, ह्यापासूनही आपल्या शरीराचा बचाव होत असतो. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये योग्य ते बदल केले तर आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहू शकते. तज्ञांच्या मते ड जीवनसत्व शरीराला योग्य प्रमाणामध्ये मिळाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटे बसल्याने शरीराला आवश्यक तितके ड जीवनसत्व मिळते. त्याचप्रमाणे आहारामध्ये मासे, चीज, अंड्यांचा पिवळा बलक ह्यामुळे ही ड जीवनसत्व मिळते.

सतत कामाचा ताण मनावर असल्यानेही शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. तसेच सतत कामाच्या घाई गडबडीमध्ये शरीराला आवश्यक असणारी विश्रांती न मिळणे, खाण्यापिण्याच्या वेळा नियमित नसणे, ह्या सवयी देखील आजारांना निमंत्रण ठरतात. त्यामुळे नियमित वेळेवर भोजन आणि दररोज रात्री किमान आठ तासांची शांत झोप रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यास आवश्यक आहे. दररोजच्या आपल्या दिनक्रमामध्ये जर मेडीटेशनसाठी साधारण वीस मिनिटे वेळ दिला, तर त्यानेही मनावरील ताण आणि शरीराचा थकवा कमी होण्यासाठी मदत मिळते.

धुम्रपान आणि मद्यपान ह्या सवयी शरीराच्या दृष्टीने घातक आहेत. सिगारेट मधील तंबाखू शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करून श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. तसेच अतिप्रमाणात केले जात असणारे मद्यपानही अनेक आजारांना कारणीभूत ठरते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी नियमित झोप, संतुलित आहार ह्याबरोबरच नियमित व्यायामाची देखील आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारच्या शारीरक कसरतीमुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्सच्या संख्येत वाढ होते, परिणामी रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच व्यायामाने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, आणि वजन नियंत्रणात राहते.

आपल्या आहारामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा नियमित उपयोग करावा. ह्यामध्ये आपण स्वयंपाक करताना वापरतो त्या मसाल्यांचा समावेश आहे. आपण वापरीत असलेले मसाले भोजनाचा स्वाद वाढवितातच, पण त्याशिवाय शरीराला अनेक तऱ्हेने लाभकारीही ठरतात. हळद, जिरे, आले, ओवा, ह्यांसारखे पदार्थ शरीराची पचनक्रिया उत्तम ठेवण्यास सहायक आहेत. त्याचबरोबर शरीरामध्ये होऊ शकणारी निरनिराळी संक्रमणे नियंत्रणामध्ये ठेवण्याची क्षमता ह्या पदार्थांमध्ये आहे. त्याचप्रमाणे मध, ग्रीन टी, लिंबाचा रस, गाजरे, पपई, दही ह्या पदार्थामुळे शरीराला आजारांपासून संरक्षण देणारे अँटी बॉडीज मिळत असतात. आपल्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. साखरेचे प्रमाण जास्त असले, तर शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स कमी होऊ लागतात. परिणामी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये असणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment