घरी आलेल्या आगंतुक पाहुण्याची ओळख सांगणारी गुगल ‘नेस्ट हॅलो’


आजवर आपल्याला हव्या त्या विषयावर माहिती मिळविण्यासाठी आपण गुगलची मदत घेत आलो आहोत. विषय कोणताही असो, त्या संबंधित माहितीसाठी आपण सर्वात आधी गुगलचा आधार घेत असतो. पण आपल्या घरी आलेल्या आगंतुक पाहुण्याबाद्ल माहिती गुगल अद्याप देऊ शकत नव्हते. पण आता ही माहिती देखील आपल्याला मिळू शकणार आहे. गुगलद्वारे तयार केल्या गेलेल्या ‘नेस्ट हॅलो’ नामक अत्याधुनिक डोअर बेलच्या मार्फेत, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याबद्द्लची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहे.

ही डोअर बेल ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाने बनलेली असून, दरवाज्याबाहेर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे रेकॉर्डिंग करण्याची क्षमता देखील ह्या डोअर बेलमध्ये आहे. वाय-फाय शी संलग्न असलेल्या ह्या डोअर बेलमध्ये स्मार्ट कॅमेरा बसविण्यात आला असून, ह्याच्या मदतीने ‘हाय डेफिनिशन’ व्हिडियो चित्रित करता येणे शक्य होते. हा कॅमेरा अंधारामध्ये, म्हणजेच ‘नाईट मोड व्हिजन’ मध्ये ही उत्तम रित्या काम करू शकतो. त्यामुळे घराच्या बाहेर फारसा उजेड नसतानाही बाहेरील व्यक्तीचा चेहरा ओळखण्याचे काम ही बेल करू शकते. ह्या डोअर बेलचे एक चांगले फीचर हे, की घरामध्ये जर गुगल ‘असिस्टंट’ स्पीकर लावलेला असेल, तर घराच्या बाहेर कोण आले आहे ह्याची माहिती ही डोअर बेल स्वतःच जाहीर करण्यास सक्षम आहे. तसेच बाहेर उभी असलेली व्यक्ती ओळखीची नसल्यास तशी सूचना ह्या बेलद्वारे दिली जाते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बेल वरदान ठरणार आहे.

Leave a Comment