स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत ५० टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली – २०१७मध्ये चक्क ५० टक्क्यांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या भारतीयांच्या पैशात वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यामुळे मोदी सरकारच्या स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या वल्गना फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. हे स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. त्याचबरोबर बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ झाली आहे.

याबाबत स्वीस बँकेच्या अहवालानुसार, स्वीस बँकेत भारतीयांचे २०१७मध्ये एकूण ७ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिलेले असतानाच, अहवालात स्पष्ट झालेल्या या आकड्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्वीस बँकेतील भारतीयांच्या पैशात २०१६मध्ये ४५ टक्क्यांची घट झाली होती. ही घट आतापर्यंतच्या बँकेच्या इतिहासातील विक्रमी घट मानली गेली होती.

स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत आतापर्यंत तीन वेळा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०११ मध्ये १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती तर, २०१३ मध्ये ४३ टक्के आणि आता २०१७ मध्ये ५०.२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. २००४ला सर्वात जास्त वाढ नोंदवली होती. त्यावेळी ५६ टक्क्यांची वाढ भारतीयांच्या पैशात झाली होती.

Leave a Comment