झुकेरबर्गची हकालपट्टी करा; भागधारकांची मागणी


फेसबुकच्या बहुतेक भागधारकांनी (शेअरधारकांनी) संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्यावर नाराजी व्यक्त केली असून त्याला पदावरून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, असे बिझिनेस इनसाईडर या संकेतस्थळाने म्हटले आहे.

फेसबुकच्या दुहेरी शेअरची रचना रद्द करण्याची इच्छा या भागधारकांनी व्यक्त केली आहे. या रचनेमुळे झुकेरबर्ग आणि त्याच्या अधिकाऱ्यांना खूप अधिकार मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

फेसबुकच्या प्रमुख भागधारकांकडे कंपनीचे एकूण मिळून 3 अब्ज डॉलर्सचे शेअर्स आहेत. झुकेरबर्ग या कंपनीचे ज्या प्रकारे व्यवस्थापन करतो त्यावरून शेअरधारकांमध्ये असंतोष वाढत आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

“संचालक मंडळाच्या रचनेबद्दल आम्हाला चिंता आहे आणि कंपनी तिच्याकडे लक्ष द्यायला तयार दिसत नाही. त्यामुळे कंपनीची प्रतिष्ठा, नियमन आणि इतर बाबतीत जोखमीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे,” सुमारे 895 दशलक्ष डॉलर्सचे फेसबुकचे शेअर्स असणारे न्यूयॉर्क सिटीचे कम्प्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगर यांनी सांगितले.

एखाद्या स्वतंत्र कार्यकारी संचालकाने मार्क झुकेरबर्ग याची जागा घ्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. कंपनीने 2012 मध्ये शेअर बाजारात प्रवेश केला होता. तेव्हापासून अशा प्रकारचा असंतोष कधीही दिसला नव्हता.

प्रसार माध्यमांमध्ये अलीकडे आलेल्या बातम्यांनंतर मार्क झुकेरबर्ग याला त्यांच्या कंपनीकडून खासगी वापरकर्त्यांची माहिती हाताळण्याच्या बाबतीत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यात केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला सुमारे 50 दशलक्ष वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती पुरविल्याबद्दल फेसबुकला टिकेला सामोरे जावे लागले होते.

Leave a Comment