अमरनाथ गुहेची ही रहस्ये अजूनही अनाकलनीय


हिंदूंसाठी अति पवित्र मानली गेलेली हिमालयाच्या कुशीतील अमरनाथ यात्रा आजपासून सुरु होत आहे आणि दहशतवादी धमक्यांना भिक न घालता लाखो यात्रेकरू या पवित्र गुहेची मार्गक्रमणा करत आहेत. या गुहेत शिवशंभोनी पार्वती मातेला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते म्हणून याला अमरनाथ असे नाव पडल्याची कथा आहे. याच गुहेत माता सतीच्या ५१ शक्तीपीठातील एक शक्तीपीठ असून येथे माता सतीचा कंठ पडला होता असा समज आहे.

अतिशय दुर्गम जागी असलेल्या या गुहेची अनेक रहस्ये आजही उलगडलेली नाहीत. या गुहेत बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या बनते मात्र हे पाणी कुठून झिरपते त्याच्या शोध लागलेला नाही. या गुहेत एक कबुतराची जोडी आहे आणि ज्या भाविकांना तिचे दर्शन होते त्यांना शिवपार्वती दर्शन देतात आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो असाही भाविकांचा विश्वास आहे.


गुहेत तयार होणाऱ्या शिवलिंगाचा बर्फ अतिशय कडक असतो पण आजूबाजूचा बर्फ मात्र भुसभुशीत असतो असा अनुभव आहे. या गुहेत पार्वती मातेला शिवाने जन्ममृत्यूचे रहस्य सांगितले तो पर्यंत पार्वती माता जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकली होती आणि प्रत्येक जन्मात तिला शिव पती म्हणून मिळाले होते असा समज आहे. शिव गळ्यात ज्या मुण्डमाला धारण करतो त्यातील मुंडक्यांची संख्या पार्वतीने घेतलेल्या जन्मांएवढी आहे असे मानले जाते.


शिवाने या गुहेत येताना गळ्यातील शेषनाग सरोवराजवळ, पिसू पिसू घाटीत, अनंतनाग अनंतनाग येथे तर भालावरचे चंदन चंदनबाडी येथे सोडले होते त्यावरून या ठिकाणांना अशी नावे मिळाली. या गुहेचा शोध बुटा मलिक नावाच्या मुस्लीम माणसाला लागला होता. हा अतिशय दयाळू माणूस बर्फात शेळ्या मेंढ्या चरायला घेऊन गेला तेव्हा त्याला एका साधूने कांगडी भेट दिली. हि कांगडी गळ्यात घालायची कोळशाची शेगडी आजही काश्मीर भागात वापरली जाते. बुटाला घरी गेल्यावर शेगडीत कोळश्या ऐवजी सोने दिसले तेव्हा साधूला धन्यवाद देण्यासाठी पुन्हा गेला. साधू भेटला नाही पण गुहा दिसली ज्यात बर्फाचे चमकणारे शिवलिंग होते. या शोधानंतर तीन वर्षांनी अमरनाथ यात्रेची सुरवात झाली असे सांगितले जाते.

Leave a Comment