प्रवासासाठी जाताना सोबत न्या हे ‘खाद्यपदार्थ’


प्रवास कुठेही असो, आणि कोणत्याही मार्गाने असो, प्रवासाची तयारी सुरु झाली, की खाऊ म्हणून बरोबर काय काय न्यायचे ह्याच्याही याद्या तयार होत असतात. आजकाल बाजारामध्ये सर्व पदार्थ तयार मिळत असले, तरी ह्या पदार्थांपैकी सर्वच पदार्थ प्रवासाला बरोबर नेता येतीलच असे नाही. त्याचबरोबर आजकाल फिटनेसच्या बाबतीत लोक जास्त जागरूक असल्याने प्रवासामध्ये देखील ‘हेल्दी’ पदार्थ खाण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे प्रवासासाठी बरोबर नेण्याचे पदार्थ ‘हेल्दी’ तर हवेतच शिवाय प्रवास लांबचा असेल, तर काही तास, किंवा काही दिवस, खराब न होता, व्यवस्थित टिकतील असे असावेत. त्या दृष्टीने अनेक पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.

दशमी हा पदार्थ प्रवासाला जाताना बरोबर देण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. साध्या पोळी किंवा पुरीसारखी दिसणारी अशी ही दशमी असते. फरक इतकाच की दशम्या बनविण्यासाठी मळले जाणारे पीठ पाण्याऐवजी दुध घालून मळले जाते. तसेच पीठ मळताना ह्यामध्ये थोडीशी साखर घातली गेल्याने ह्या दशमीला गोडसर चव असते. ह्या दशम्या तीन ते चार दिवस चांगल्या टिकतात. त्याचप्रमाणे तिखट-मीठाच्या पुऱ्या देखील लांबच्या प्रवासाला नेण्यासाठी चांगल्या. प्रवासादरम्यान तोंडात टाकायला काही तरी म्हणून खारे दाणे किंवा खारे चणे हे पर्याय देखील चांगले आहेत. त्याचप्रमाणे सुकी भेळही प्रवासात बरोबर नेण्यास सोपी आणि सर्वांच्याच आवडीची असते.

मेथीचे ठेपले लांबच्या प्रवासामध्ये पुष्कळ टिकतात. त्याचप्रमाणे गोड आवडत असल्यास बेसनाचे, तिळाचे किंवा रव्याचे लाडू देखील प्रवासामध्ये नेण्यासाठी चांगले. बर्फीला मात्र काही तासांनी चिकटपणा येऊन ती खराब होऊ लागण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कच्च्या किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडाही अनेक दिवसांपर्यंत टिकून राहतो. असा चटपटीत चिवडा घरी तयार करता येऊ शकतो, किंवा बाजारामध्येही सहज उपलब्ध असतो. खाखरा किंवा मठरी हे पदार्थ देखील लांबच्या प्रवासामध्ये पुष्कळ काळ ताजे राहणारे आहेत. मठरी मध्ये आपल्या आवडीनुसार मेथी, किंवा इतर कुठलाही फ्लेवर घालता येऊ शकतो. त्याचप्रमाणे साळीच्या लाह्या आणि मखाने हा खाऊ देखील जास्त काळ टिकून राहणारा आणि अर्थातच आरोग्यासही उत्तम असा आहे.

Leave a Comment