इराणकडून पेट्रोल आयात बंद करण्यासाठी अमेरिकेचा सहयोगी देशांवर दबाव


वॉशिंग्टन – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अन्य सहयोगी देशांवर इराणकडून पेट्रोल आयात बंद करण्यासाठी दबाव टाकत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही बंदी टाकण्यात येणार असून याबाबतची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबत एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहीतीनुसार, सध्या इराणसोबत व्यापार करत असलेल्या कोणत्याही देशाला अमेरिका सवलत देत नाही. संबंधित देशांनी या संदर्भात कशी प्रतिक्रिया दिली याबाबत विचारल्यावर, त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

इराण अणू करारपासून वेगळे होण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेने इराणवरुन काढलेले निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्धार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणसोबत ज्या कंपन्या व्यवसाय करतील त्यांनी १८० दिवसात आपली गुंतवणुक बंद करण्याचा इशारा दिला असून असे न केल्यास त्या देशांना दंड करण्यात येणार आहे.

युरोपातील अनेक सहकाऱ्यांनी या करारातून माघार घेण्याबद्दल अमेरिकेवर जोरदार टीका केली. ते लवकरच युरोपीय देशांमधील करारानुसार इराणच्या सुरक्षेसाठी एक पॅकेज देण्यात येणार असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ प्रवक्त्यांनी सांगितले.

Leave a Comment