अमरनाथ यात्रेसाठी सीआरपीएफ जवानांना अनोखी बाईक


अमरनाथ यात्रेची सुरवात २८ जूनला झाली असून भाविकांचा पहिला जत्था अमरनाथ गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. यंदाही या यात्रेवर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन सरकारने पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यंदा सीआरपीएफ जवान यात्रा मार्गावर तैनात असून त्यांना वेळ पडल्यास दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यास योग्य आणि वेळ आल्यास अँब्यूलंस म्हणून वापरता येतील अश्या खास बाईक दिल्या गेल्या आहेत.

या बाईकचे एक स्पेशल स्क्वाड बनविले गेले असून प्रत्येक बाईकवर दोन कमांडो आहेत. त्याच्याजवळ अत्याधुनिक हत्यारे आणि हायटेक गॅजेट आहेत तशीच प्रथमोपचार कीट आहेत. बाईक चालविताना एक खास हेल्मेट त्यांना दिले गेले असून त्यावर आजूबाजूच्या ४०० मीटर परिसरातील हालचाली टिपू शकेल असा शक्तीमान कॅमेरा आहे आणि त्याचा संपर्क थेट कंट्रोल रूमशी आहे. त्यामुळे कंट्रोल रूम मध्ये बसलेले जवान संबंधित परिसरातील हालचाली टिपू शकणार आहेत.

यात्रेदरम्यान काही अपघात घडलाच तर हि बाईक मिनी अँब्यूलंस म्हणून उपयोगात येणार आहे.या बाईकवर मागे खुर्ची सारखी सीट असून त्यातून जखमींना त्वरित रुग्णालयात नेता येणार आहे. हा सर्व भाग डोंगराळ असल्याने येथे गाड्यांपेक्षा बाईक अधिक उपयुक्त ठरतात. तसेच कंट्रोल रूमशी सहज संपर्क साधणे सहज शक्य होते असे सांगितले जात आहे.

Leave a Comment