आता आस्वाद घ्या आरोग्यदायी ‘रेड टी’चा


ग्रीन टीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र आता ग्रीन टीच्या जोडीने ‘रेड टी’ देखील, त्यातील आरोग्याला लाभकारक असणाऱ्या गुणांमुळे लोकप्रिय होऊ लागला आहे. किंबहुना रेड टी, ग्रीन टी पेक्षा अधिक लाभकारी असल्याचे म्हटले जात आहे, शिवाय ह्याची चवही ग्रीन टी पेक्षा अधिक रुचकर असल्याने ह्या चहास लोकांची अधिक पसंती मिळू लागली आहे. ह्या चहाचे आरोग्यासाठी फायदे आणि हा चहा कसा तयार करायचा ह्याची माहिती खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

रेड टीच्या सेवनाने पाचन तंत्र सुरळीत राहते. तसेच ह्यामुळे पचनाशी निगडीत विकार आणि बद्धकोष्ठामध्ये विशेष लाभ दिसून येतात. ह्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंटस् हृदयाच्या आरोग्यासाठी सहायक आहेत. ह्या चहाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम रहात असून, लहान मोठे आजार उद्भविण्याची शक्यता ह्या चहाच्या सेवनामुळे कमी होते. ह्या चहाच्या सेवनाने लठ्ठपणा आणि शरीरामध्ये साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

हा चहा डाळिंबाच्या दाण्यांपासून बनविला जात असल्याने ह्याला लाल रंग येतो. म्हणूनच ह्या चहाला ‘रेड टी’ म्हटले जाते. चहा बनविण्यासाठी तीन कप डाळिंबाच्या दाण्यांचा रस काढून घ्यावा. ह्या रसामध्ये आवश्यक वाटल्यास थोडी साखर घालावी. हे मिश्रण गाळून घेऊन एका घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकून राहील. चहा बनविण्यासाठी ह्या मिश्रणातील पाव कप मिश्रण कपमध्ये घालून घेऊन त्यावर पाऊण कप गरम पाणी घालावे. आवडत असल्यास चवीला एक लहान चमचा मध ही घालावा. हा झाला रेड टी तयार.

हा चहा आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी असला, तरी ह्याचे अतिसेवन अपायकारक ठरू शकते. विशेषतः गर्भवती महिला आणि स्तनपान कराविणाऱ्या महिलांनी ह्या चहाचे सेवन टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment