सरकारने तेलासाठी घेतलेली 2 लाख कोटी रुपयांची कर्जे फेडली – पेट्रोलियम मंत्री


पूर्वीच्या सरकारने तेल कर्जरोख्यांच्या माध्यमातून घेतलेली 2 लाख कोटी रुपयांची कर्जे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने फेडली असल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी केला. परतफेड केलेल्या रकमेत या कर्जावरील व्याजाचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसने अलीकडे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढविला होता. त्याला उत्तर म्हणून प्रधान यांनी हा दावा केला आहे. आमच्या सरकारच्या कार्यकाळात 2012, 2013, 2014 मध्ये इंधनाच्या किंमती इतक्या जास्त नव्हत्या, असा दावा काँग्रेसने सातत्याने केला आहे.

आणीबाणीच्या 43 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने पाटणा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रधान बोलत होते.

देशात अशी परिस्थिती का उद्भवत आहे, याचे कारण सांगत असल्याचा दावा करून ते म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाने (सरकार) 1.44 लाख कोटी रुपयांच्या ऑइल बाँडची खरेदी केली. ती आम्हाला वारसा रूपाने मिळाली. एवढेच नाही तर त्यावरील व्याजापोटीही आम्ही 70 हजार कोटी रुपये दिले. आम्ही एकूण (2 लाख कोटी रुपये) परत करून आमची जबाबदारी पार पाडली आहे.”

“जो बाप आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी मालमत्ता मागे सोडून जातो त्याला समाजामध्ये आदर मिळतो. परंतु जो बाप कर्ज घेऊन दिवाळखोर बनतो आणि त्याच्या पुढील पिढीसाठी ओझे ठेवून जातो, त्याला काय म्हणावे,” असा सवाल प्रधान यांनी केला.

Leave a Comment