‘भुली भटियारी महल’; येथे जाण्यास आहे मनाई


भारताची राजधानी दिल्ली येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे नकारात्मक शक्तीचा वास असल्याची समजूत आहे. या ठिकाणांवर अनेकांना चित्रविचित्र अनुभव येत असतात. वास्तवात येथे खरेच कोणत्या प्रकारची नकारात्मक शक्ती आहे किंवा नाही हे ठामपणे सांगता येऊ शकत नसले, तरी ह्या ठिकाणी घडलेल्या तथाकथित घटनांच्या कहाण्या इतक्या प्रसिद्ध आहेत, की ह्या ठिकाणी जाण्याची हिम्मत फार कोणी दाखवत नाही. केवळ ह्या शक्तीचा शोध घेण्याच्या उद्देशाने काही हौशी मंडळी मात्र ह्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. अश्याच एका ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे, ‘भुली भटियारी महल’.

हे ठिकाण दिल्ली सारख्या महानगरामध्ये असूनही अगदी उजाड, सुनसान आहे. दिवस मावळू लागला, की ह्या परिसरातील वर्दळ एकदमच कमी होऊन जाते. दिवसा उजेडी देखील ह्या परिसरामध्ये लोकांची वर्दळ फारशी पाहण्यास मिळत नाही. हे ठिकाण दिल्लीमधील करोल बाग नामक अतिशय व्यस्त बाजारपेठेच्या जवळ आहे. करोल बागहून बग्गा लिंक ह्या ठिकाणाकडे जाण्यासाठी एक निर्जन रस्ता आहे. हा रस्ता सरळ ‘भुली भटियारी’ महालाकडे घेऊन जाणारा आहे. ह्या ठिकाणाबद्दल स्थानिक लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहेच, पण त्यापेक्षाही जास्त भीतीची भावना आहे. येथे जाणाऱ्या लोकांना आलेले चित्रविचित्र अनुभव ह्या भितीमागील कारण असल्याचे म्हटले जाते.

ह्या ठिकाणी अनेकांना अनेक प्रकारचे विचित्र अनुभव आल्याच्या कथा प्रसिद्ध असल्याने, सावधानतेचे सूचक म्हणून ह्या ठिकाणी संध्याकाळनंतर येण्यास बंदी असल्याचा फलकही पहावयास मिळतो. इतकेच नाही तर संध्याकाळनंतर ह्या ठिकाणी जाणारा रस्ता बंद करण्यासाठी दिल्ली पोलिसांची ‘बॅरिकेड्स’ देखील येथे पाहायला मिळतात. ह्या ठिकाणाचे भय लोकांच्या मनामध्ये इतके पक्के आहे, की संध्याकाळनन्तर सुरक्षा कर्मचारी देखील येथे थांबत नाहीत. ह्या ठिकाणी गेलेल्या लोकांना नेमके काय पाहायला मिळाले ह्याचा कोणताही स्पष्ट पुरावा नसला, किंवा ह्या ठिकाणी जाण्यास लोक इतके का कचरतात, ह्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी हे ठिकाण दिल्ली सारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागामध्ये असूनही निर्जन, ओसाड आहे एवढे मात्र नक्की.

Leave a Comment