मुन्डेश्वरी मंदिरात दिला जातो सात्विक बळी


भारतात देवापुढे प्राण्याचा बळी देण्याची परंपरा जुनी आहे आणि आता त्यावर बंदी घातली गेली आहे. प्राचीन काळच्या संस्कृतीच्या अनेक खुणा सांभाळून असलेल्या आणि रामायण, महाभारतात उल्लेख येणाऱ्या बिहार राज्यात एक प्राचीन देवी मंदिर असेही आहे जेथे आजही बळी दिला जातो मात्र तो सात्विक बळी असतो.


बिहारमध्ये अनेक धर्म उदयाला आले आहेत आणि या प्राचीन धर्मांच्या अनेक खुणा जागोजागी या राज्यात दिसतात. मार्कंडेय पुराणात ज्याचा उल्लेख आहे त्या कैमुर पर्वतावरील पावरा पहाडावर ६०८ फुट उंचीवर मुन्डेश्वरी मातेचे प्राचीन मंदिर आहे. शुंभ निशुंभ याचे सेनापती चन्ड मुण्ड याच्या वध या देवीने केला असे उल्लेख पुराणात येतात. या देवीसमोर आजही बळी दिला जातो. हा सात्विक बळी असतो. म्हणजे बळीसाठी आणलेला बकरा देवीसमोर बांधून त्याच्यावर पुजारी मंत्रून अक्षता टाकतात. त्यावेळी हा बकरा काही काळ मृतावस्थेत जातो व पुजारी पुन्हा देवीच्या पावलावर अक्षता ठेऊन त्या बकर्याच्या अंगावर टाकतात तेव्हा बकरा उठून बसतो. हा चमत्कार आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. याला सात्विक बळी असे म्हणतात. नंतर बकऱ्याला मोकळे सोडले जाते.

चन्ड मुण्ड यांचा वध करण्यासठी हि देवी आली तेव्हा तिने चन्ड राक्षसाचा वध केला मात्र मुण्ड राक्षस या पहाडावर लपून बसला होता. देवीने या पहाडावर येऊन त्याला ठार केले तेव्हापासून तिला मुन्डेश्वरी असे नाव पडले. येथेच देवीचे मंदिर बांधले गेले आहे. हे प्राचीन मंदिर अष्टाकार गर्भगृह असलेले आहे. मंदिर परिसरात पडलेले अनेक कोरीव खांबांवर श्रीयंत्र, सिद्ध यंत्र कोरलेली दिसतात.


या मंदिर आवारात पंचमुखी शिवलिंग असून हे शिवलिंग सकाळ, दुपार आणि सायंकाळी रंग बदलते. मंदिर परिसरात ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहेत. मुन्डेश्वरी देवी समोर मनापासून व्यक्त केलेली कोनातीहि मनोकामना पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे.

Leave a Comment