ब्रिटिशांना हस्तंगत न करता आलेले भारतातील खजिने


प्राचीन काळामध्ये भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जात असे, इतका वैभवसंपन्न असा हा देश होता. त्यामुळेच अनेक परकीय सत्ताधाऱ्यांनी ह्या प्रांतावर निरनिराळ्या वेळी आक्रमणे करुन येथून भरपूर धनदौलत लुटून नेल्याच्या अनेक घटना इतिहासामध्ये उल्लेखिलेल्या आहेत. ह्यातील काही खजिने तर रामायण, महाभारताच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. भारतावर दोनशे वर्षे राज्य केल्यानंतर भारत सोडताना, ब्रिटीशांनी त्यांच्या हाताला लागेल ते जवळजवळ सर्व वैभव लुटून नेले. पण भारतामध्ये काही ठिकाणी असेही खजिने अस्तित्वात होते, जे ब्रिटिशांना हस्तंगत करताच आले नाहीत. ब्रिटिशांना जी लुटीची ठिकाणे माहित होती, तिथून त्यांना शक्य होती ती सर्व दौलत त्यांनी लुटली, पण आपल्या पूर्वजांनी प्राचीनकाळी काही ठिकाणी दडविलेले खजिने मात्र त्यांच्या हाती लागले नाहीत, आणि म्हणून ते सुरक्षित राहिले. आजच्या काळामध्ये ह्या खजिन्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे. ह्या खजिन्यांच्या विषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

जेव्हा मुघल सम्राट जहांगीर ह्यांना सत्तेतून हटविले गेले, तेव्हा त्यांनी राजस्थानमधील अल्वरच्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला. हा किल्ला दिल्लीपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर स्थित आहे. जेव्हा जहांगीर ह्या किल्ल्यामध्ये राहण्यासाठी आला, तेव्हा त्याने आपल्यासोबत प्रचंड संपत्ती देखील आणली, आणि ह्या किल्ल्यामध्ये दडविली. ह्या संपत्तीपैकी बहुतेक धन आजही दडविलेले आहे. ह्या संपत्तीचा शोध घेण्याच्या कामी फारसे यश आलेले नाही. बिहार मधील सोनभांडार नामक गुंफा एकाच मोठ्या शिळेमधून कोरलेल्या आहेत. ह्या गुंफा तिसऱ्या किंवा चौथ्या शतकामध्ये कोरल्या गेल्या असल्याचा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. ह्या गुंफेमध्ये पश्चिमेकडील कक्ष पहारेकर्यांचे असून, तिथून पुढची वाट राजा बिम्बिसाराच्या खजिन्याकडे जाते असे म्हटले जाते. ह्या कक्षाचा दरवाजा कसा उघडायचा ह्याबद्दलच्या सूचना तेथील शिलालेखामध्ये आहेत असे म्हणतात. पण तरीही ह्या शिलालेखाचा अर्थ आजतागायत कोणाला लावता आला नसल्यामुळे बिम्बिसाराच्या खजिन्याकडे जाणारा दरवाजा आज ही बंद असल्याचे म्हटले जाते.

हैदराबाद येथे असलेल्या चारमिनारच्या खालून एक भुयार, थेट गोलकोंडा किल्ल्याला जाऊन मिळते असे म्हणतात. सुलतान मोहम्मद कुली कुतब शाह ह्यांनी हे भुयार बनवविले होते. धोक्याच्या वेळी, शत्रूचे आक्रमण होण्याचे संकेत मिळताच राजपरिवारातील सदस्यांना सुखरूप निसटता यावे म्हणून हे भुयार तयार करण्यात आले होते. ह्या भुयारामध्येही खजिना लपविलेला असल्याचे म्हणतात. जयपूरचे राजे पहिले मानसिंह सम्राट अकबराचे सरसेनापती होते. १५८० साली अफगाणच्या स्वारीवरून जेव्हा मानसिंह परत आले, तेव्हा तिथून आलेली लूट त्यांनी सरकारदरबारी जमा न करता, किल्ल्याच्या तळघरामध्ये लपविली. आणीबाणीच्या काळी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी ह्या खजिन्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील मूकाम्बिका मंदिर कोल्लूर जवळ आहे. ह्या मंदिरामध असलेले सर्पाचे चिन्ह, पाहणाऱ्याला अतिशय सामान्य वाटेल. पण मंदिराच्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या खाली असलेल्या तळघरामध्ये असलेला खजिण्याचे रक्षण करण्यासाठी हे सर्प तेथे आहेत.