गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या ह्या क्रमांकांचा अर्थ नेमका काय?


आपल्या घरी गॅस सिलेंडर असतो, त्यावर लिहिलेला नंबर नेमके काय दर्शवितो हे आपल्याला ठाऊक आहे का? गॅस सिलेंडरवर लिहिलेला हा नंबर त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट दर्शवितो. प्रत्येक सिलेंडरवर त्या त्या एजन्सीमार्फत हा एक्सपायरी डेट दर्शविणारा नंबर लिहिला जातो. एजन्सीतील कर्मचारी किंवा सिलेंडरची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा क्रमांक कसला आहे, हे माहित असते, पण ग्राहकाला मात्र ह्या बद्दल माहिती असेलच असे नाही. त्यामुळे हा क्रमांक नेमके काय दर्शवितो हे जाणून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्पायर झालेला सिलेंडर मिळू नये ह्याची खबरदारी प्रत्येकाला घेता येऊ शकेल.

हे जाणून घेणे अतिशय सोपे, पण तितकेच महत्वाचेही आहे. त्यानंतर तुमच्या हाती संपूर्णपणे सुरक्षित असलेला सिलेंडरच पडत आहे, ह्याची खात्री तुम्हाला करून घेता येईल. सिलेंडरचे हँडलच्या खाली ज्या तीन उभ्या लोखंडी पट्ट्या असतात, त्यातील एका पट्टीवर का क्रमांक लिहिलेला असतो. ह्या क्रमांकामध्ये A,B,C, किंवा D ह्यांपैकी एक अक्षर असते. ही चार अक्षरे वर्षाचे चार खंड दर्शवितात. प्रत्येक भाग किंवा खंड तीन महिन्यांचा कालावधी दर्शवितो. म्हणजेच A अक्षर जानेवारी ते मार्च हे तीन महिने दर्शवितो, B म्हणजे एप्रिल ते जून, C अक्षर जुलै ते सप्टेंबर आणि D अक्षर ऑक्टोबर ते डिसेंबर असे कालवधी दर्शवितात.

जर सिलेंडरवर A-17 असा क्रमांक असेल, तर ह्याचा अर्थ हा सिलेंडर २१०७ सालच्या जानेवारी ते मार्च ह्या काळामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यानंतर ह्या सिलेंडरचा वापर करणे क्वचित प्रसंगी धोक्याचे ठरू शकते. अक्षरानंतर लिहिलेला क्रमांक, उदाहरणार्थ A-20 हा सिलेंडर एक्स्पायर होण्याचे वर्ष दर्शवितो. त्यामुळे जर कोणच्या घरी C-17 क्रमांक लिहिलेला सिलेंडर असेल, तर तो सिलेंडर एक्स्पायर झालेला असून, वापरण्यास धोकादायक ठरू शकतो. अश्या प्रकारे एक्स्पायर झालेल्या सिलेंडर मधून गॅसची गळती होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सिलेंडर घेताना त्यांवरील क्रमांक तपासून पाहणे अगत्याचे आहे.

Leave a Comment