यूट्यूब, इन्स्टाग्रामसाठी अमेरिकी नवयुवकांची फेसबुकला सोडचिठ्ठी


जगभरात लोकप्रिय असलेली सोशल मीडिया साईट फेसबुकने अमेरिकन नवयुवकांमध्ये मात्र लोकप्रियता गमावली आहे. फेसबुकचे सदस्य असलेल्या नवयुवकांची संख्या कमी होत असल्याचे प्यू रिसर्च सेंटर या जगप्रसिद्ध संस्थेने म्हटले आहे.

प्यू रिसर्च सेंटर ही संस्था विविध विषयांवर सर्वेक्षण करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. संस्थेने केलेल्या पाहणीनुसार अमेरिकेतील 13 ते 17 वयोगटातील 51 टक्के नवयुवकांनी फेसबुक वापरत असल्याचे सांगितले. याच संस्थेने तीन वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत हे प्रमाण 71 टक्के एवढे होते. यूट्यूब ही अमेरिकी लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय सेवा आहे, असे या पाहणीत आढळले. यूट्यूब वापरणाऱ्यांची संख्या 85 टक्के एवढी आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामचा क्रमांक लागतो. या सेवेचे 72 टक्के वापरकर्ते आहेत, तर 69% युवकांनी स्नॅपचॅट वापरत असल्याचे सांगितले. टम्बलर, रेडिट यांसारख्या सेवा दहा टक्क्यांपेक्षाही कमी वापरतात.

मार्च महिन्यात याच संस्थेने एक पाहणी केली होती. त्यात 68 टक्के वयस्कर व्यक्तींनी फेसबुक वापरत असल्याचे सांगितले होते. संस्थेने 743 नवयुवक आणि एक हजारांपेक्षा अधिक पालकांच्या मुलाखती मार्च आणि एप्रिल 2018 या काळात घेतल्या होत्या. या मुलाखतींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला.

Leave a Comment