शास्त्रज्ञांनी तयार केला जगातील तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटा संगणक


अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात छोटा संगणक तयार केला असून हा संगणक प्रत्येक बाजूने केवळ 0.3 मिलीमीटर म्हणजेच तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटा आहे. कॅन्सरचे निदान करणे आणि त्याच्या उपचारासाठी नवीन मार्ग शोधणे यासाठी या संगणकाचा उपयोग होऊ शकतो.

यापूर्वीची जगातील सर्वात छोटी संगणक प्रणाली आयबीएम कंपनीने आणली होती. मार्च महिन्यात सादर करण्यात आलेला तो संगणक प्रत्येक बाजूला 1 मिलीमीटर एवढा होती. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी हा संगणक तयार केला आहे. मात्र त्याबाबत ठामपणे बोलण्यास शास्त्रज्ञ तयार नाहीत. “यांना संगणक म्हणावे का नाही, याबाबत आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. संगणकासारखे किमान कार्य हे करते की नाही, यावर चर्चा होऊ शकते,”असे मिशिगन यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेविड ब्लाऊ यांनी सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

मोठे संगणक अंतर्गतरीत्या चार्ज नसतीलही तेव्हाही त्यांच्यातील माहिती सुरक्षित राहते. मात्र हे छोटे संगणक डिस्चार्ज होताच त्यांच्यातील प्रोग्रामिंग आणि डेटा समाप्त होऊन जातील.

या संगणकाकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतील. या संगणकाची निर्मिती करणाऱ्या चमूने तापमान मापदंडाची स्पष्टता माहीत करून घेण्यासाठी त्याचा वापर केला.

Leave a Comment