आता दुबईत दोन दिवस व्हिसाविना रहाता येणार


नवी दिल्ली: भारतीय नागरिकांची दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये संख्या मोठी असून संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) हीच बाब लक्षात घेत मोठा निर्णय घेतला आहे. युएई सरकारच्या नव्या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.

दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना ४८ तास दुबईमध्ये राहण्यासाठीयूएई सरकारच्या नव्या निर्णयामुळे काहीही खर्च येणार नाही. याशिवाय जर दोन दिवसांहून अधिक काळ पर्यटकांना येथे राहायचे असल्यास ५० दिरहॅम अर्थात १००० रुपयांचे शुल्क देऊन चार दिवस राहता येणार आहे.

यूएई सरकारने हा निर्णय भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी घेतला आहे. पण अद्याप यूएई सरकारकडून ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही. यूएईचा ट्रान्झिट व्हिसा दुबईतील विमानतळांवर उभारलेल्या ‘पासपोर्ट कंट्रोल हॉल’मध्ये मिळणार आहे.

२०१७ मध्ये जवळपास ३.७० लाख भारतीय पर्यटकांनी दुबई आणि अबुधाबीमध्ये भेट दिली आणि ही संख्या आता वाढतच जात आहे. यूएईशिवाय इस्राइल, जपान, ओमान आदी देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.

Leave a Comment