भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह


अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. सूर्यासारख्या एका ताऱ्याजवळ हा ग्रह असून या ग्रहाला ईपीआईसी 211945201बी किंवा के2-236बी असे नाव देण्यात आले आहे.

प्रा.अभिजीत चक्रवर्ती यांच्यानेतृत्वाखालील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या एका चमूने हा शोध लावला आहे. हा ग्रह उप-शनि किंवा सुपर नेप्च्यून आकारातील आहे. पृथ्वीच्या आकारमानापेक्षा तो 27 पट मोठा असून त्याची त्रिज्या पृथ्वीपेक्षा 6 पट आहे.

अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी या संस्थेच्या ऑनलाईन नियतकालिकात हा संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाला आहे.

या शोधामुळे आपल्या सौर प्रणालीबाहेरच्या ग्रहांचा शोध लावणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित पीआरएल अॅडवान्स रेडियल-व्हेलोसिटी अबू-स्काय सर्च (पारस) या स्पेक्ट्रोग्राफने या ग्रहाचा शोध लावण्यात आला, हे विशेष. पारस (पीएआरएएस) हा संपूर्ण आशियात त्याच्या पद्धतीचा एकमेव स्पेक्ट्रोग्राफ आहे. हा स्पेक्ट्रोग्राफ माऊंट आबू येथील गुरूशिखर वेधशाळेत 1.2एम टेलिस्कोपने सुसज्ज आहे. पृथ्वीच्या आकारमानापेक्षा 10 ते 70 पट मोठ्या असलेल्या केवळ 23 प्रणालींचा आतापर्यंत शोध लावण्यात आला आहे.

Leave a Comment