शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास…


जेव्हा आपण अन्नग्रहण करतो, तेव्हा त्या अन्नाद्वारे मिळणारी तत्वे आपले शरीर अवशोषित करीत असते. युरीक अॅसिड ह्या तत्वांपैकी एक तत्व आहे. बेहुतेक युरीक अॅसिड आपल्या शरीरातील रक्तप्रवाहामार्गे किडनी पर्यंत पोहोचविले जाऊन त्यानंतर लघवीवाटे बाहेर टाकले जाते. पण जर युरीक अॅसिडचे प्रमाण शरीरामध्ये वाढले, तर आपले शरीर त्याचा संपूर्णपणे निचरा करू शकत नाही. त्यामुळे शरीरामध्ये युरीक अॅसिडची मात्रा आणखीनच वाढू लागते. परिणामी अनेक तक्रारी उद्भवू लागतात. जर युरीक असिडची मात्रा प्रमाणाबाहेर वाढली, तर त्यामुळे इतर गंभीर व्याधी उद्भविण्याचा धोका संभवतो. शरीरामध्ये युरीक असिडचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढल्याने हाताच्या, व पायांच्या बोटांच्या सांध्यांमध्ये वेदना, टाचा आणि गुडघे परत परत दुखणे, सुजणे, ते सांधे लाल दिसणे अश्या समस्या जाणवू लागतात. अश्या वेळी गुडघे किंवा टाचा, काही तरी आतून टोचत असल्याप्रमाणे दुखतात.

रक्तामध्ये युरीक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्यास किडनी स्टोन, किंवा किडनीशी निगडित अन्य काही विकार, मधुमेह इत्यादी रोग उद्भविण्याची शक्यता वाढते. जर शरीरामध्ये वाढणारे युरीक अॅसिडचे प्रमाण वेळीच नियंत्रणात आणले गेले नाही, तर हे युरीक अॅसिड हळू हळू सांध्यांमध्ये जमा होऊ लागते. ह्या साठत गेलेल्या युरीक अॅसिडमुळे हाडांचे आकारही बदलू लागतात. ही अवस्था ‘गाऊट’ सारख्या विकारांना जन्म देणारी आहे. ‘गाऊट’ हा आजार मुख्यत्वे शरीरामध्ये युरीक अॅसिडचे प्रमाण अतिशय जास्त असल्याने उद्भविणारा विकार आहे.

जर सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये टोचल्या प्रमाणे वेदना होऊ लागली, तर ह्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित रक्ताची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ह्या तपासणीतून शरीरामध्ये युरीक अॅसिडचे प्रमाण वाढले आहे किंवा नाही हे स्पष्ट होते. जर हे प्रमाण वाढलेले असले, तर त्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. युरीक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा अवलंबही केला जाऊ शकतो. ह्यासाठी ताज्या दुधी भोपळयाच्या रसामध्ये भाजलेल्या ओव्याची पूड आणि काळ्या मिरीची पूड घालून ह्या रसाचे सेवन केल्याने लाभ होतो. मात्र दुधीचा रस पिण्यापूर्वी तो कडवट/कडू लागत नाही ह्याची खात्री करून घेणे अतिशय गरजेचे असते. दुधीचा रस कडू असला, तर तो प्राणघातक ठरू शकतो. त्याचप्रमाणे गिलोयच्या रसाच्या सेवनानेही युरीक अॅसिडची मात्रा नियंत्रित करणे शक्य होते. हा ज्यूस कोणत्याही आयुर्वेदिक औषधींच्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन उपलब्ध आहे. गिलोय प्रमाणेच अॅलोव्हेरा आणि आवळ्याच्या रसाच्या सेवनानेही युरीक अॅसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

युरीक असिड कमी करण्यासाठी मुबलक मात्रेमध्ये पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. मद्यपान, शरीरातील आम्ल वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने युरीक अॅसिड वाढू शकते, त्यामुळे मद्य, प्रोसेस्ड खाद्यपदार्थ ह्यांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अतिशय तेलकट, मसालेदार पदार्थांच्या सेवनानेही युरीक अॅसिडची मात्रा वाढू शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणेही टाळायला हवे. शरीरामध्ये प्रथिने जास्त झाल्यास युरीक अॅसिडचे प्रमाण वाढू लागत असल्याने, प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असलेल्या पदार्थांचे सेवन संतुलित मात्रेमध्ये केले जाणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment