गोष्ट आगळ्या वेगळ्या ‘रावणहट्टा’ या वाद्याची


कधी राजस्थानच्या सफरीवर गेला असाल आणि तेथील पर्यटनस्थळी भेट देताना लोकगीते कानी पडली असतील, तर ह्या गीतांना साथ करणाऱ्या एका वाद्द्याचा आवाजही तुम्ही नक्कीच ऐकला असेल. अतिशय मधुर, सुरेल असे हे वाद्य म्हणजे ‘रावणहट्टा’. राजस्थान आणि गुजरात मधील लोक कलावंतांचे हे खास वाद्य. लंकाधिपती रावण ह्याने ह्या वाद्द्याचे निर्माण केले अशी आख्यायिका असल्याने ह्याचे नाव ‘रावणहट्टा’ पडल्याचे म्हटले जाते. लंकाधीश रावण हा प्रकांड पंडित असून, अतिशय कुशल राज्यकर्ता तर होताच, पण त्याचबरोबर संगीत आणि वीणावादनामध्येही तो पारंगत होता. ह्या वाद्द्यापासून प्रेरणा घेऊनच व्हायोलीन ह्या वाद्द्याची निर्मिती झाली असावी असे इतिहासकारांचे मत आहे.

रावणहट्टा हे वाद्य खासकरून गुजरात आणि राजस्थानमधील काही जमातींची खासियत आहे. ह्या जमाती मुख्यतः भटक्या धनगर जमाती असून, उंट पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. अश्या सुमारे बत्तीस निरनिराळ्या जमाती अस्तित्वात आहेत. हे वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांना ‘भोप’ म्हटले जाते. ह्या वाद्द्यावर लोकगीते, तसेच धनगरांचा देव असणाऱ्या ‘पाबुजी’ ची स्तुतीपर भजने वाजविली जाण्याचा प्रघात आहे. हे वाद्य तयार करण्यासाठी एका पोकळ बांबूच्या टोकाला नारळाची करवंटी जोडली जाऊन, त्यावर कातडे चढविण्यात येते. त्यानंतर तारांची जुळणी करून, धनुष्याच्या आकाराप्रमाणे दिसणाऱ्या ‘बो’ ने हे वाद्य वाजविले जाते. हा ‘बो’ लाकूड आणि घोड्यांच्या केसांच्या सहाय्याने तयार केला जातो.

ह्या वाद्द्याचे ‘रावणहट्टा’ हे नाव ‘ रावण हस्त वीणा ‘ ह्याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते. लंकाधिपती रावण हा मोठा शिवभक्त असून, देवाची आराधना म्हणून तो वीणा वादन करीत असे. रावणाला युद्धामध्ये रामाच्या हातून मरण आल्यानंतर त्याची हस्त वीणा हनुमानाने लंकेहून भारतामध्ये आणली अशी आख्यायिका आहे. मात्र ह्या आख्यायिकेची सत्यासत्यता सिद्ध करणारा कोणत्याही प्रकारचा लेखी पुरावा अस्तित्वात नाही. तरी ही रावणहट्टा हे वाद्य अतिशय प्राचीन आहे ह्यावर मात्र संगीताचे जाणकार आणि इतिहासकारांचे एकमत आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांमध्ये व्हायोलीन ह्या वाद्द्याच्या इतिहासावर आधारित पुस्तकांमध्येही व्हायोलीन रावणहट्टा ह्या वाद्द्यापासून प्रेरणा घेऊन तयार केले गेले असू शकते असा उल्लेख आहे. ह्या वाद्द्याचा उल्लेख, १०९४ ते ११३३ या काळामध्ये होऊन गेलेल्या नान्यदेव नामक पंडिताच्या ‘ भारतभाष्य’ ह्या काव्यामध्येही सापडतो.

जोएप बोर हे नेदरलँड्स मधील लायडेन विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे संगीतज्ञ असून, रावणहट्टा हे वाद्य त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हे वाद्य भारतामध्ये बाराव्या शतकामध्ये अस्तित्वात आले असल्याचे जोएप बोर ह्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याकाळी देखील हे वाद्य संगीतातील प्रमुख वाद्यांपैकी एक नसून, मुख्यत्वे, धनगर इत्यादी भटक्या जमातींकडे दिसणारे एक वाद्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरच्या काळामध्येही हे वाद्य राजस्थान आणि गुजरात येथील भटक्या जमातींपुरतेच मर्यादित राहिले. अलीकडच्या काळामध्ये राजस्थान आणि गुजरात येथे पर्यटन भरपूर वाढले असून येथील लोक कलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत असल्याने आता रावणहट्टा हे वाद्य लोकांच्या माहितीचे होऊ लागले आहे, व ह्या वाद्यामध्ये आता लोकांची रुची वाढताना दिसू लागली आहे.

Leave a Comment