येथे साजरा होतो आगळ्या पद्धतीने गणेशोत्सव


भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. ढोल ताशांच्या पथकांचे सराव, रस्त्यांमध्ये सार्वजनिक मंडळांचे मांडव, गणेशाच्या आगमनाची सूचना जवळ जवळ महिनाभर आधीपासूनच देत असतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये तर सर्वांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. सार्वजनिक गणपती मंडळांनी त्यांच्या मांडवामध्ये केलेली सजावट पाहण्यासाठी लोकांच्या गर्दीने रस्ते नुसते फुलून जातात. घरोघरी येणाऱ्या गणपती बाप्पांचे स्वागतही उत्साहाने होत असते.

महाराष्ट्रातील आग्रोळी गावामध्येही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण इथे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आगळीवेगळी आहे. ह्या गावातील ‘हटके’ परंपरेचे वृत्त ‘बेटर इंडिया’ ने प्रसिद्ध केले आहे. एकूण २६०० लोकांची वस्ती असलेले हे लहानसे गाव, ह्या आगळ्या वेगळ्या परंपरेचे पालन, गेली छपन्न वर्षे करीत आले आहे. ह्या गावामध्ये ठिकठीकाणी मांडव न घातले जाता, किंवा घरोघरी गणपती न आणले जाता, गावामध्ये एकाच ठिकाणी मांडव घालून सर्व परीवारांचा मिळून अश्या एकाच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असते. ह्या गावमध्ये तीनशे परीवार आहेत. मासेमारी आणि मीठागारांमध्ये कामे करून हे परिवार आपले घर चालवितात.

गणेशोत्सव हा मोठा सण असल्याने हा सण गावातील प्रत्येक परिवाराला आवर्जून साजरा करायचाच असे. पण अनेक परिवारांची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे कर्ज घेऊन लोक हा सण साजरा करीत असत. सण साजरा तर करायचा, पण त्यासाठी पैसे नसल्यामुळे कर्ज घ्यावे लागायचे ही अनेक परिवारांची दुविधा लक्षात आल्यानंतर मीठागार कामगार संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन एक नवीन योजना अंमलात आणण्यात आली. ह्या अंतर्गत गावामध्ये भव्य मांडवाचे निर्माण करून, सर्व परिवारांचा मिळून एकच गणपती बाप्पा आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हापासून गेली छपन्न वर्षे ही परंपरा अशीच सुरु आहे. ह्या एकमेव मंडळाचे सभासद होण्यासाठी प्रत्येक परिवाराला दर वर्षी केवळ पाच रुपये भरावे लागतात. आता गावातील प्रत्येक परिवार, पैशांची चिंता केल्याविना, मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतो. ह्या काळामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात असते.

Leave a Comment