आंतरराष्ट्रीय उड्डाणात एअर इंडिया देणार ‘महाराजा’चा अनुभव


एअर इंडियाच्या विमानांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना आता राजेशाही अनुभव मिळणार आहे. कारण एअर इंडिया लवकरच ‘महाराजा’ श्रेणीचे आसन बिझनेस क्लासमध्ये देणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेशही आणण्यात येणार आहेत.

या नव्या उत्पादने आणि सेवांची अधिकृत घोषणा 22 जूनला होण्याची शक्यता आहे. नागरी हवाई उड्डयन मंत्री सुरेश प्रभू आणि त्यांचे राज्यमंत्री जयंत सिन्हा हे नव्या उत्पादनांची घोषणा करतील. नुकसानीत चालणाऱ्या या सरकारी विमान कंपनीची विक्री करण्याचा निर्णय सरकारने नुकताच पुढे ढकलला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय येत आहे.

“विमान कंपनी लवकरच महाराजा बिझनेस वर्ग पुन्हा सुरू करणार आहे,” असे नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराजा बिझनेस क्लासच्या आसनांसाठी सध्याच्या बोईंग 777 आणि 787 विमानांमधील विद्यमान प्रथम श्रेणी आणि व्यावसायिक वर्गांचे नवीनीकरण करण्यात येणार आहे. “या नवीनीकरणाचा हेतू विमानसेवेत आवश्यक बदल घडवून आणणे आणि ती अधिक ग्राहक-अनुकूल बनविणे हा आहे,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात देशात एअर इंडियाकडे 17 टक्के बाजार हिस्सा आहे.

Leave a Comment