ही आहेत जगातील सर्वात सुंदर द्वीपे


भटकंतीसाठी जर एखाद्या सुंदर द्वीपावर जाण्याचा विचार असेल, तर अशी अनेक सुंदर, निसर्गसौंदर्याने नटलेली द्वीपे जगभरात आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची उत्तम सोय, येथील खास खानपान, आणि वेळ घालाविण्याकरिता अनेक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. फ्रेंच पॉलीनेशियामध्ये, ताहितीच्या पश्चिमोत्तर भागामध्ये बोरा बोरा हे सुंदर द्वीप आहे. स्क्युबा डायव्हिंग साठी हे द्वीप अतिशय प्रसिद्ध आहे. येथे ऋतू दोनच- उन्हाळा आणि पावसाळा. थंडी येथे नावालाही नाही. जर हायकिंगची आवड असेल, तर त्यासाठी ग्वादेलूप आयलंड्सची निवड योग्य ठरेल. येथे हायकिंग सोबत अंडर वॉटर डायव्हिंगही करता येऊ शकते. अनेक सुंदर कोरल रीफ्सने नटलेली ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स हा एकूण साठ द्वीपांचा समूह आहे. येथील चार मुख्य द्वीप पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

सँटोरिनी हे द्वीपही अतिशय आकर्षक आहे. बहामाज ह्या द्वीपसमूहामध्ये लहान मोठी अशी सातशे आयलंड्स आहेत. ह्यामध्ये ‘ग्रँड बहामा’ आणि ‘पॅराडाइज आयलंड’ ही द्वीपे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या द्वीपांच्या सभोवार असलेले पाणी अतिशय नितळ, स्वच्छ आहे. येथे स्नोर्केलिंग करता येते. तसेच येथील बोटानिकल गार्डन्सही प्रसिद्ध आहेत. फ्रेंच पॉलीनेशियामध्ये असणारे ताहिती हे सर्वात मोठे द्वीप आहे. अनेक सुंदर धबधबे, हायकिंग साठी अनेक ट्रेल्स ह्या ठिकाणी आहेत. इंडोनेशियामध्ये असणारे बाली हे द्वीप, तेथील तांदुळाची शेते, कोरल रीफ्स आणि ज्वालामुखींसाठी प्रसिद्ध आहे.

तीनशे पेक्षा अधिक लहान मोठ्या द्वीपांचा समूह असलेल्या फिजी आयलंड्समधील ‘वितिलेवू’ आणि ‘वानुआ लेवू’ ही दोन द्वीपे विशेष प्रसिद्ध आहेत. येथील हिंदू मंदिरे, ‘मड पूल्स’ पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मेडिटेरेनियन समुद्रामध्ये असलेले सार्डिनीया हे इटालियन द्वीप अनेक सुंदर सागरी किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथील वाईन आणि चीजदेखील जगप्रसिद्ध आहे. मलेशिया येथील लांग्कावी आयलंड अनेक सुंदर वर्षावनांनी परिपूर्ण आहे. येथे असलेला सेव्हन वेल्स नामक धबधबा आणि रोपवे येथील मुख्य आकर्षणे आहेत. अतिशय सुंदर तलाव आणि काळ्या वाळूचे बीचेस असलेले सिसिली, मेडीटेरेनियन समुद्रातील सर्वात मोठे द्वीप आहे. येथे अनेक लहान मोठे ज्वालामुखी देखील आहेत. येथे असणारे पालेर्मो शहर इटलीतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. सेशेल्स द्वीपसमुहातील प्रसिद्ध आयलंड असणारे माहे येथील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंनी भरलेल्या बाजारपेठांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनेक सुंदर रिसोर्ट्स येथे पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.

Leave a Comment