कोलंबियामध्ये सापडलेला खजिना नेमका कोणाच्या मालकीचा?


स्पॅनिश जहाज सॅन होजे समुद्राखाली गडप झालानंतर अनेक वर्षे ह्या जहाचाचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र त्यामध्ये कोणालाही यश येत नव्हते. अखेर तीनशे वर्षांनतर, २०१५ साली ह्या जहाजाचा शोध कोलंबियाच्या कार्टाजेना समुद्रकिनाऱ्याच्या नजीक लागला. हे जहाज शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून होत असणाऱ्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. समुद्रामध्ये वर्षानुवर्षे अनेक जहाजे बुडत आली आहेत. मग ह्याच एका जहाजाच्या शोधासाठी इतकी मेहनत कशाकरिता घेतली गेली? ह्याचे कारण असे, की ह्या जहाजावर कोट्यवधी डॉलर्स किंमतीचा खजिना होता. ही कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती जहाजावर असतानाच हे जहाज समुद्राने गिळंकृत केले. पण आता इतकी दशके उलटून गेल्यानंतर ह्या जहाजावरील खजिन्यावर मालकी हक्क नेमका कोणाचा आहे, हे समजणे कठीण होऊन बसले आहे.

स्पॅनिश जहाज सॅन होजे हे भलेमोठे जहाज स्पॅनिश नौदलाच्या अधिपत्याखाली असून, सर्वप्रथम १६९८ साली ते जहाज सेवेत रुजू करण्यात आले. त्यानंतर दहा वर्षांनी एका युद्धामध्ये ह्या जहाजाला क्षति पोहोचून त्याला जलसमाधी मिळाली. त्याचबरोबर त्या जहाजावर असलेले सोने, चांदी, अनेक बहुमूल्य रत्ने देखील पाण्याखाली गडप झाली. आजच्या काळामध्ये ह्या संपत्तीची किंमत सतरा अब्ज डॉलर्स असल्याचे बोलले जात आहे. इतकी भरमसाट संपत्ती अचानक सापडल्यानंतर ह्या संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी अनेकजण अर्थातच पुढे आले. हे जहाज स्पॅनिश असल्यामुळे, पण कोलंबियाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सागरकिनाऱ्याजवळ सापडल्याने दोन्ही प्रांतांची सरकारेही त्यावर आपला हक्क सांगत आहेत. ह्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन प्रांतांमध्ये वादंग निर्माण झाले असून, फारच चमत्कारिक परिस्थिती उद्भविली आहे.

त्यासोबत ह्या जहाजावर सापडलेले सोने, चांदी, रत्ने हे सर्व संपत्ती मूळ कोणाच्या मालकीची आहे ह्यावरही वाद सुरु आहेत. त्या काळी स्पॅनिश साम्राज्याचे राज्यकर्ते, इतर प्रांतांवर हल्ला करून तेथील संपत्ती लुटण्यासाठी ओळखले जात असत. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया प्रांतातील खाणींमधून हे संपत्ती लुटली गेली असल्याचाही अनेकांचा कयास आहे. त्यामुळे अर्थातच बोलिव्हिया देखील आपला हक्क ह्या संपत्तीवर सांगत आहे. ह्या खाणींमध्ये सोने आणि रत्ने शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक कामगारांना आपले आयुष्य गमवावे लागले होते.

सॅन होजे जहाजाचा शोध आता सुमारे तीनशे वर्षांच्या कालावधीनंतर लागला असला, तरी हे जहाज जिथे नेमके सापडले ते ठिकाण कोलंबिया सरकारच्या वतीने गुप्त ठेवण्यात आले आहे. तसेच ह्या जहाजाचे अवशेष काही काळानंतर संग्रहालयामध्ये ठेवण्यात येऊन त्यानंतर ते लोकांना पाहण्यासाठी खुले केले जाणार असल्याची घोषणा कोलंबिया सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment