पल्लव वंशाचा हा राजा मूळचा व्हियेतनाममधला


सुमारे बाराशे वर्षांपूर्वी, सातव्या शतकामध्ये एक बारा वर्षे वयाचा मुलगा, तत्कालीन मध्य व्हियेतनामच्या चंपा प्रांतातून कांचीपुरम येथे आला. कांचीपुरम ही त्याकाळी अतिशय बलाढ्य, पराक्रमी समजल्या जाणाऱ्या पल्लव साम्राज्याची राजधानी होती. हा बारा वर्षाचा मुलगा चंपाहून कांचीपुरम येथे पोहोचल्यानंतर त्याचा राज्याभिषेक करण्यात आला, आणि हा मुलगा, पल्लव साम्राज्याचा सम्राट बनला. हा मुलगा होता पल्लव राजवंशाचा आठवा राजा, नंदिवर्मन. नंदिवर्मन पल्लव घराण्याचा राजा असला, तरी त्याचा त्यांचा जन्म मात्र भारतातला नाही, हे तथ्य फारसे सर्वश्रुत नाही.
अगदी प्राचीन काळापासून व्हियेतनाम आणि कंबोडिया सारख्या पूर्वोत्तर आशियायी देशांशी भारताचे जवळचे संबंध होते. मध्य आणि दक्षिणी व्हियेतनाम आणि त्याकाळी कम्बुजदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंबोडियाच्या ह्या प्रांताला ‘चंपा’ ह्या नावाने ओळखले जात असे. बर्मा, मलेशिया, कंबोडिया आणि व्हियेतनाम मधील बंदरांवर सामानाची नेहमीच आवक जावक होत असल्याने अनेक भारतीय व्यापाऱ्यांचे येथे सतत येणेजाणे सुरु असे. काही भारतीय व्यापारी तर चंपा प्रांतामध्ये स्थायिकही झाले होते.

मूळचा चाम जमातीच्या अधिपत्याखाली असलेला चंपा हा प्रांत, चौथ्या शतकाच्या सुमारास भारतीयांच्या संपर्कामध्ये आला. त्याकाळच्या पल्लव साम्राज्याचे चंपा वासियांशी जवळचे संबंध होते. त्यामुळेच ३८० सालापासून ४१८ सालापर्यंत चंपावर राज्य करणाऱ्या भद्रवर्मन ह्या राजाने देखील पल्लव राज्यकर्त्यांप्रमाणे आपल्या नावाला ‘वर्मन’ हे नाव जोडले. तेव्हापासून भद्रवर्मन राजानंतर सत्तेवर आलेल्या सर्वच राजांनी आपल्या नावापुढे ‘वर्मन’ जोडण्याची प्रथा चंपा प्रांतामध्ये रूढ झाली. ५७५ ते ६०० सालामध्ये पल्लव साम्राज्याचा अधिपती असणारा राजा सिंहविष्णू ह्याने कांचीपुरम येथे पल्लावांची राजधानी स्थापन केली. हा राजा अतिशय पराक्रमी असून, कलाप्रेमीही होता. सिंहविष्णू हा विष्णुदेवभक्त असल्याने त्याच्या काळामध्ये अनेक सुंदर विष्णूमंदिरांचे निर्माण केले गेले. ह्या सिंहविष्णू राजाचा धाकटा भाऊ भीमवर्मन पूर्वोत्तर आशिया प्रांतामध्ये गेला, आणि तिथे त्याने आपले साम्राज्य स्थापित केले. म्हणूनच चंपाचा राजवंश आणि पल्लव साम्राज्य ह्यांचे जवळचे संबंध होते.

इकडे भारतामध्ये ७३१ साली पल्लव साम्राज्याचा राजा परमेश्वरवर्मन चालुक्य वंशाच्या विक्रमादित्य राजाच्या हातून युद्धामध्ये मारला गेला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर पल्लव साम्राज्यामध्ये एकच गोंधळ उडाला. याचे कारण असे, की परमेश्वरवर्मनचा कोणीही वारस नव्हता. त्यामुळे साम्राज्याची जबाबदारी कोणावर सोपवायची ह्याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यावेळी दरबारातील कारभाऱ्यांनी व्हियेतनाम ह्या आपल्या मित्रादेशाकडून मदत घेण्याचे ठरविले. पल्लव साम्राज्याला स्वामी मिळवून देण्याच्या उद्देशाने चंपाच्या राजाच्या नात्यातील बारा वर्षीय मुलाची निवड करण्यात आली. पल्लवमल्ल नावाच्या ह्या मुलाला कांचीपुरम येथे आणण्यात येऊन राजा नंदिवर्मन म्हणून त्याचा राज्याभिषेक केला गेला.

पुढील चौसष्ट वर्षे राजा नंदिवर्मनने पल्लव साम्राज्याचा राज्यकारभार सांभाळला. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला पंड्या साम्राज्यासोबत अनेक युद्धांना तोंड द्यावे लागले. नंदिवर्मन वयाने लहान असल्याने त्याला राज्यकारभाराची, युद्धनीतीची दीक्षा देणे अतिशय आवश्यक होते. ही जबाबदारी सेनापती उदयचंद्र ह्यांनी यशस्वीरित्या पेलली. नंदिवर्मनच्या कारकीर्दीमध्ये पल्लव साम्राज्यावर अनेक आक्रमणे झाली, पण नंदिवर्मनने आपला प्रांत कधीही शत्रूच्या हाती पडू दिला नाही. जर प्रांत शत्रूच्या ताब्यात गेलाच, तर तो प्रांत नंदीवर्मनने पुन्हा जिंकून घेतला. अश्या रीतीने त्याच्या कारकीर्दीमध्ये त्याने पल्लव साम्राज्य अखंड ठेवले आणि जपले. वयाच्या ७८व्या वर्षी नंदिवर्मन राजाचे निधन झाले.

Leave a Comment