या गावाची आहे मगरींशी दोस्ती


मगर सुसर यांचे नुसते नाव ऐकले तरी आपल्याला भीती वाटते. एखाद्या नदीत, सरोवरात मगरी आहेत असे नुसते कळले तरी त्या बाजूला कुणी फिरकत नाही. मगरी सुसरी असले भयानक प्राणी फक्त प्राणीसंग्रहालयात पाहायचे अशी आपली समजूत असते. आफ्रिकी देश बुर्कीनो फासो मधल्या बजूले या गावाची गोष्ट मात्र निराळीच आहे. येथे मगरीला पवित्र मानले जातेच पण येथील लहान मुले, मोठी माणसे मगरीच्या अंगाखांद्यावर अगदी आरामात बसतात. त्यांच्याबरोबर पाण्यात पोहतात.

बुर्कीनो राजधानीपासून ३० किमीवर बजूले हे गाव आहे. येथील एका तलावात १०० पेक्षा अधिक मगरी आहेत. येथे राहणारा पियरे काबोर म्हणतो लहान असल्यापासून मी मगरीबरोबर खेळतो आहे. त्यांच्या अंगावर लोळतो, त्यांच्याबरोबर पोहतोही. कुणी कुणी त्याच्या पाठीवर झोपतात सुद्धा. आमच्या येथल्या मगरी पवित्र आहेत आणि त्या कुणाला काही करत नाहील. १५ व्या शतकापासून माणसे आणि मगरी याच्यात हे दृढ नाते आहे. त्यामागे एक कारण आहे.

त्यावेळी येथे दुष्काळ पडला होता. पाण्याचे दुर्भिक्ष होते. यावेळी एका महिलेला एक मगर या पाण्याच्या सरोवरापाशी घेऊन गेली. गावाचे पाणी संकट टळले. तेव्हापासून येथे मगर पवित्र मानली जाते. मगरीने केलेल्या उपकाराची जाणीव म्हणून तेव्हापासून दरवर्षी मगर महोत्सव साजरा केला जातो. यावेळी मगरीकडे समृद्धी, स्वास्थ्य आणि चांगले पिक येवो अशी विनवणी केली जाते. येथे मगरीला पूर्वज मानले जाते. त्यामुळे एखादी मगर मरण पावली तर माणसाप्रमणे तिचे दफन केले जाते. असेही सांगतात गावावर काही संकट येणार असेल तर या मगरी रडतात आणि संकटाची पूर्वसूचना देतात.

Leave a Comment