संधिवातासाठी उपयुक्त अरोमा थेरपी


संधिवात किंवा सांधेदुखी हा आजार आजच्या काळामध्ये केवळ वयस्क लोकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. आजकाल अगदी तरुण वयातच लोकांना सांधे दुखी सतावू लागली आहे. अनियमित दिनक्रम, खाण्यापिण्याची आबाळ, व्यायामाचा अभाव, चुकीची पोश्चर्स ह्यामुळे अगदी तरुण वयातच सांधेदुखीचा विकार उद्भवू लागला आहे. त्यामुळे ह्या विकारापासून आराम मिळविण्यासाठी अनेक तऱ्हेचे उपाय, उपचार अवलंबले जात असल्याचे आपण पाहतो. आपले शरीर २०६ हाडांच्या मदतीने उभे आहे. ह्यातील काही हाडांमध्ये जोड किंवा सांधे असतात, जे हाडांना जोडून ठेवण्याचे काम करतात. आपल्या शरीरामध्ये खांदे, कोपर, मनगटे, हिप्स, आणि गुडघे येथे हाडांचे प्रमुख सांधे असतात. ह्या सांध्यांमुळे आपल्याला उठणे, बसणे, चालणे, वस्तू उचलणे, इत्यादी कामे करता येणे शक्य होत असते. ह्यापैकी एक सांधा जरी कमकुवत झाला, तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. तसेच सांध्यांच्या ठिकाणी दुखापत झाली असता ही हालचाल करणे कठीण होऊन बसते. थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी जास्त जाणवते.

जसजसे वय वाढत जाते तसतसे कार्टीलेज कमकुवत झाल्याने, किंवा शरीरामध्ये कॅल्शियम, क्षारांच्या कमतरतेमुळे, सांधे दुखी उद्भवते. पण तरुण मंडळींच्या बाबतीत बोलायचे झाले तर तरुण वयामध्ये उद्भविणारी सांधेदुखी ही मुख्यत्वे अयोग्य जीवनशैलीचा परिणाम असते. ऑफिसमध्ये जास्त काळ बसून काम करण्याने, किंवा शरीराला पुरेशी हालचाल न मिळाल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण नीट होऊ शकत नाही. सतत फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन, धुम्रपान, मद्यपान इत्यादी सवयी देखील घातक ठरतात. आहारामध्ये ड जीवनसत्व, क्षार आणि कॅल्शियम च्या कमतरतेमुळे सांधेदुखी आणखीनच बळावते. ह्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्वाचे आहे.

सांधेदुखीवर अनेक तऱ्हेचे उपचार उपलब्ध आहेत, ह्यापैकी प्रभावी उपचार आहे अरोमा थेरपीचा. ह्या उपचारपद्धतीमुळे सांधेदुखीपासून दीर्घ काळापर्यंत आराम मिळू शकतो. पण त्यासाठी ह्या थेरपीच्या योग्य प्रकारे वापर केला जाणे आवश्यक आहे. अरोमा ऑइल्स आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत करण्यास सहायक आहेत. ह्यांच्या वापरामुळे सांध्यांवरील सूज कमी होऊन वेदना नाहीशी होते. ह्यासाठी निरनिराळ्या अरोमा ऑइल्स चा वापर करता येऊ शकतो. पेपरमिंट ऑइल चे पाच ते सहा थेंब दोन चमचे कोमट खोबरेल तेलामध्ये मिसळून त्याने दुखणाऱ्या सांध्यांना लगेच मालिश करावी. त्याचप्रमाणे निलगिरीचे तेल देखील खोबरेल तेलामध्ये मिसळून लावता येऊ शकते. जिंजर ऑइल व लॅव्हेंडर ऑइल एकत्र करून ह्याची मालिश केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो. कायेन पेपर ऑइलचे काही थेंब खोबरेल तेलामध्ये मिसळून ह्याने मालिश करता येते, किंवा सांध्यांवर सूज आली असल्यास लोबान तेल ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसळून लावता येते. रोजमेरी ऑइल सांधेदुखीसाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जुनिपर ऑइलचे काही थेंब लोशन किंवा एखाद्या क्रीममध्ये मिसळून हे क्रीम दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्याने आराम पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment