लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस कसा ओळखावा?


संधिवात, सांधेदुखी किंवा आर्थ्रायटीस हे विकार बहुतेकवेळी उतार वयामध्ये उद्भविणारे विकार आहेत. हाडांची झालेली झीज, त्यांना मिळणारे अपुरे वंगण, शरीरामध्ये क्षारांची, ड जीवनसत्वाची कमतरता, सांध्यांना झालेली दुखापत, इन्फेक्शन्स, कॅल्शियमची कमी ह्या आणि अश्या इतर अनेक कारणांनी आर्थ्रायटीसचा विकार उद्भवू शकतो. तरुण मंडळींच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तरुण वयामध्ये आर्थ्रायटीस होण्यामागे आजकालच्या ‘फास्ट आणि इंस्टन्ट’ जीवनशैलीचा मोठा हात आहे. मग लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस दिसून येतो का, तर हो, येतो. लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस सर्रास आढळत नसला, तरी हे अशक्य नाही. लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या आर्थ्रायटीसला ज्युव्हनाईल इडियोपथिक किंवा रह्यूमटॉईड आर्थ्रायटीस (JIA / JRA )म्हटले जाते.

सोळा वर्षांखालील मुलांमध्ये असणाऱ्या ‘इडियोपथिक’ आर्थ्रायटीसचे नेमके कारण सांगता येऊ शकत नाही. सामान्यपणे आर्थ्रायटीस उद्भाविण्यासाठी जी करणे असतात, ती कारणे ह्या बाबतीत आढळतातच असे नाही. हा विकार मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. अगदी लहान वयात किंवा मुले किशोरावस्थेत असताना हा विकार उद्भवू शकतो. हा एक ‘ऑटोइम्यून’ आजार आहे. ह्याचा अर्थ असा, की शरीर स्वतःच्याच निरोगी सेल्सला अपाय करू लागते. परिणामी, सांध्यांवर सूज येऊ लागते. शरीराची ही क्रिया नेमकी कशामुळे होते हे सांगता येणे कठीण असले, तरी बहुतेक वेळा हा विकार अनुवांशिक असण्याची किंवा एखाद्या व्हायरस मुळे उद्भविण्याची शक्यता असल्याचे तज्ञ म्हणतात.

ह्यामुळे निर्माण झालेल्या विकाराची काही निश्चित लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस उद्भविल्यास सांध्यांवर सूज दिसून येते. तसेच सांध्यांची हालचाल होण्यास अडचण भासू लागते. सांध्यांना हात लावल्यास सांधे उष्ण जाणवितात. हालचाल करणे अवघड होत असल्यामुळे लंगडल्याप्रमाणे चालणे, किंवा हातामधून वस्तू सहजी निसटून पडणे अश्या समस्या जाणवू लागतात. ह्या विकारामुळे मुलांना सतत थकवा जाणवू लागतो. क्वचित अंगात बारीक ताप राहून अंगावर हलके पुरळही येऊ शकते. आर्थ्रायटीस ने ग्रासलेल्या मुलांचे सांधे सकाळच्या वेळी जास्त दुखतात. खूप खेळल्यामुळे किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर ज्याप्रकारे अंग दुखते, त्यापेक्षा आर्थ्रायटीसची वेदना पुष्कळ वेगळी असते.

आर्थ्रायटीस असणाऱ्या काही मुलांना सांधेदुखी कधी तरी जाणविते, तर काही मुलांच्या बाबतीत सांधेदुखी सतत सुरु राहते. ज्या मुलांच्या बाबतीत सांधेदुखी सतत सुरु राहते, त्यांच्या शारीरिक वाढीवरही ह्याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. ही सांधेदुखी नियंत्रित ठेवण्यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपीचा चांगला उपयोग होतो. लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीसचे निदान करण्याकरिता रक्ताची तपासणी, एक्स रे, एम आर आय, जॉइंट फ्लुइड अॅनालिसीस इत्यादी प्रकारच्या तपासण्या करून रोगाचे योग्य निदान करता येते, आणि त्यानुसार उपचार पद्धतीचा अवलंब करता येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment