ही आहे भारतातील ‘राजेशाही’ ट्रेन


एखाद्या राजेशाही थाट असणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी परदेशामध्ये जावे लागेल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर असे अजिबात नाही. आता हा राजेशाही प्रवास आपल्याला भारतामध्ये करता येणेही शक्य आहे. त्याचबरोबर सध्या भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ह्या ट्रेनप्रवासावर खास सवलती देखील देण्यात आल्या आहेत. ‘डेक्कन ओडेसी’ नामक ही ट्रेन जगातील सर्वात ‘लक्झरी’ ट्रेन्स पैकी एक आहे. सर्व तऱ्हेच्या सुखसोयींनी परिपूर्ण अशी ही ट्रेन पश्चिम भारतामध्ये प्रवास करीत असून, ह्या ट्रेनचा प्रवास जगातील सर्वात महाग समजल्या जाणाऱ्या प्रवासांपैकी एक आहे.

एखाद्या राजवाड्यात राहून शाही थाटाचा अनुभव करून देणारी ही ट्रेन, भारतातील एकमेव लक्झरी ट्रेन नाही. ह्या ट्रेनशिवाय राजस्थान येथे असणाऱ्या ‘पॅलेस ऑन व्हील्स’ आणि ‘महाराजा एक्स्प्रेस’ ह्या दोन्ही ट्रेन्स लक्झरी ट्रेन्स आहेत. जगभरामध्ये ह्या ट्रेन्स, त्यातील सुंदर सजावट आणि त्याहूनही उत्तम आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भरपूर पैसे खर्च करावे लागत असताना देखील, ह्या ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सर्व जगभरातून पर्यटक येथे येत असतात. डेक्कन ओडेसी ह्या ट्रेनमधील सर्व केबिन्स अतिशय सुंदर पद्धतीने सजविल्या गेल्या असून, ह्यामध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात, तश्या सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. तसेच ह्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याची हर एक गरज पूर्ण करण्यासाठी अतिशय तत्पर सहायक नेमलेले असतात. ह्या ट्रेनमधील प्रत्येक केबिनसाठी वेगळ्या सहायकाची नेमणूक केली जाते.

ह्या ट्रेनमधून जिथे जिथे प्रवास करायचा असतो, त्या ठिकाणची खास पर्यटन स्थळे फिरून दाखविण्यासाठी, त्यांच्याबद्दल प्रवाश्यांना माहिती देण्यासाठी स्थानिक गाईड्स ह्या ट्रेनमध्ये उपलब्ध असतात. एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखे, जगभरामध्ये प्रसिद्ध असणारे उत्तमोत्तम खाद्यपदार्थ ह्या ट्रेनमध्ये प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले जातात. ताशी ऐंशी किलोमिटरच्या गतीने प्रवास करणारी ही ट्रेन महाष्ट्रातील अनेक सुंदर ठिकाणांना भेट देत प्रवास करते. ह्या ट्रेनचा प्रवास सात रात्री, आठ दिवस इतका असून, सुंदर समुद्रकिनारे आणि गोव्यातील भव्य चर्चेसचे दर्शनही करण्याची संधी ह्या प्रवासादरम्यान मिळते. त्याचबरोबर अजंता एलोरा, नाशिक मधील ‘वाईन टूर’, गोवा आणि सिंधुदुर्ग ह्यांचे दर्शन ही ह्या प्रवासामध्ये घडते. ही ट्रेन मुंबईहून निघून, नाशिक, अजंता एलोरा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असा प्रवास करीत मुंबईला परतते.

Leave a Comment