मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय?


आपले डोळे हे आपल्या शरीरातील पंचेन्द्रीयांपैकी एक महत्वाचा अवयव आहे. आजकाल, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर ह्यांच्या वाढत चाललेल्या वापरामुळे डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत चालले आहे. ह्यापैकी एक समस्या म्हणजे मॅक्युलर डीजनरेशन किंवा वाढत्या वयानिशी उद्भविणारे एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन. खरेतर हे समस्या उतारवयामध्ये उद्भविणारी समजली जात असून, पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये ही समस्या उद्भविण्याची शक्यता जास्त असते. ह्याचे कारण हे, की महिलांचे सामान्य (अॅव्हरेज) आयुष्यमान पुरुषांच्या तुलनेत अधिक असते.

मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय हे जर सरळ सोप्या भाषेमध्ये समजावायचे झाले, तर ज्याप्रमाणे कॅमेरा मध्ये असलेल्या रोल वर एखादे छायाचित्र उमटते, त्याचप्रकारे आपण पहात असलेल्या वस्तूचे चित्र आपल्या डोळ्यातील रेटीनावर उमटत असते. जर ह्या रेटीनाचे काही नुकसान झाले, तर दृष्टीदोष निर्माण होतात. डोळ्यातील रेटीनाचा मॅक्युला नामक भाग हळू हळू कमकुवत होऊ लागतो, आणि त्यामुळे दृष्टीदोष उत्पन होऊ लागतात. जर मॅक्युला कमकुवत होऊ लागला, तर हा दोष बरा न करता येणारा आहे. ह्यामुळे अंधुक दिसणे, कमी दिसणे, किंवा दृष्टी अजिबात जाणे ह्या समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे ही समस्या वयस्क व्यक्तींमध्ये आढळते. ह्या समस्येचे निदान करण्यासाठी काही लक्षणे विचारात घेणे आवश्यक आहेत. आपल्या घरातील वयस्क मंडळींच्या बाबतीत ही लक्षणे जाणवत असतील, तर तर त्यांना त्वरित नेत्ररोगतज्ञांकडे नेणे आवश्यक आहे.

अनके वयस्क मंडळींना अंधुक, किंवा धूसर दिसू लागले, की आपल्याला मोतीबिंदू झाला असावा, किंवा डोळ्यांचा नंबर वाढला असावा अशी त्यांची समजूत होते. पण अंधुक दिसणे केवळ मोतीबिंदुचेच लक्षण नाही. हे लक्षण मॅक्युलर डीजनरेशनचे देखील असू शकते. त्याचप्रमाणे डोळ्यांनी पाहताना जर मधोमध डाग असल्याप्रमाणे दिसत असेल, आणि हा डाग हळू हळू वाढत असल्याचे जाणवत असेल, तर हे ही एम डीचे लक्षण असू शकते. मक्युलर डीजनरेशन असल्यास गडद रंग पाहताना त्रास जाणवू शकतो. तसेच समोरच्या कागदावरील सरळ रेघा तिरक्या, किंवा वेड्यावाकड्या भासू लागतात.

अनेकदा लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होऊ लागल्यानंतर डोळ्यांचा नंबर वाढल्याने चष्मा लावण्याची गरज असल्याची आपली समजूत होते. पण जर व्यक्तीचे वय पन्नास वर्षांच्या पुढे असेल, आणि दूरच्या वस्तू पाहण्यास त्रास होत असेल, तर नेत्ररोग तज्ञांकडून तपासणी करून घेऊन मॅक्युलर डीजनरेशनची समस्या तर नाही, ह्याची खात्री करून घ्यावी. आपल्या दिसण्यात जर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला, आणि आपले वय पन्नास वर्षांच्या पुढे असले, तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर ह्या समस्यांचे योग्य आणि वेळशीर निदान केले गेले तर ह्या समस्यांवर वेळीच उपायोजना करता येऊ शकते.

मधुमेह आणि हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांनी आपल्या डोळ्यांची खास काळजी घ्यावी. सतत टीव्ही, कॉम्प्युटर किंव मोबाईलचा वापर टाळावा. जर कॉम्प्युटरवरच काम करीत असाल, तर अधून मधून डोळ्यांना थोडा वेळ विश्रांती देणे आवश्यक आहे. डोळे धुताना पाणी सामान्य तापमान असलेले वापरावे. खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने डोळे धुवू नयेत. डोळ्यांशी संबंधित कोणताही विकार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषधोपचार करू नयेत. वय जास्त असेल तर डोळ्यांची नियमित तपासणी करून घेत राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपला आहार डोळ्यांच्या आरोग्यासाठी पूरक हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment