तुमचा आवडता रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो?


एखाद्या कवीच्या कविता असोत, किंवा एखाद्या चित्रकाराचे चित्र असो, जेव्हा ह्या कलाकृतींमध्ये रंग भरले जातात, तेव्हा ती कलाकृती जिवंत होते, थेट मनाला जाऊन भिडते. आपले देखील असेच असते. ज्या गोष्टीचे रंग आपल्या मनाला भावतात, त्या गोष्टींची निवड करण्याकडे आपला कल जास्त असतो. सर्वच रंग दिसताना दिसत असले, तरी रंगांच्या बाबतीत प्रत्येकाची अशी खास पसंती, निवड असतेच. आपल्याला आवडणारे रंग आपल्या स्वभावाबद्दलही खूप काही सांगत असतात. आपण डोळ्यांनी जे पाहतो, कानांनी जे ऐकतो आणि मनाने ज्यावर विश्वास ठेवतो, किंवा ज्या गोष्टी आपल्याला पटतात, अश्या गोष्टी चटकन आत्मसात करण्याची सवय आपल्या मेंदूला असते. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला साजेलशा वस्तू साहजिकच आपल्या जास्त आवडीच्या असतात. आपल्या वस्तूंवरून आपल्या आवडी निवडी स्पष्ट होत असतात. ठीक त्याचप्रमाणे आपला आवडता रंगही आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगत असतो.

ज्यांना लाल रंग आवडतो, त्या व्यक्ती अतिशय मनस्वी असतात. त्याच्या प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक नातेसंबंधामध्ये ह्या व्यक्ती अतिशय समरस झालेल्या दिसतात. त्यांना आपले स्थान आणि आपली क्षमता पुरेपूर ठाऊक असते. त्यांना न पटणाऱ्या गोष्टींना ह्या व्यक्ती कधीच मान्यता देत नाहीत, मात्र कुठलेही काम करताना ते अचूक करण्याकडे ह्या व्यक्तींचा कल असतो. ह्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेणे, नेतृत्व करणे आवडते. ज्या व्यक्तींना पिवळा रंग आवडतो, अश्या व्यक्ती अतिशय आनंदी स्वभावाच्या असतात आणि इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. जिथे ह्या व्यक्ती जातील तिथे त्यांची इतरांची पटकन मैत्री होते. ह्या व्यक्तींचा स्वभाव पटकन आवडून जाईल असा असून, ह्या व्यक्ती मनाने अतिशय चांगल्या असतात. इतरांना मदत करणे, असेल त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणे ह्या व्यक्तींना अगदी सहज जमते.

ज्या व्यक्तींना जांभळा रंग आवडतो, अश्या व्यक्ती आपल्या बोलण्याने इतरांना खुश करण्यात पटाईत असतात. ह्या व्यक्ती आपल्या मधुर वाणीने इतरांची गुपिते काढून घेण्यात पटाईत असतात. ह्या व्यक्ती अतिशय धाडसी स्वभावाच्या असून, दृढ आत्मविश्वास असणाऱ्या असतात. गुलाबी रंग आवडणाऱ्या व्यक्ती अतिशय भरोश्याच्या असतात. तुमचे गुपित ह्यांच्याजवळ अगदी सुरक्षित असते. जिथे जातील तिथे ह्या व्यक्ती आकर्षणाचे केंद्र ठरतात. इतरांचे अंधानुकरण करण्याच्या ऐवजी ह्या व्यक्ती त्यांच्या मनाला आणि बुद्धीला जे पटेल ते करतात, त्यामुळे ह्या व्यक्ती यशस्वी होतात. ह्या व्यक्ती क्षमाशील वृत्तीच्या असतात. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी इतरांचा विचार करण्याचा ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो.

ज्या व्यक्तींना काळा रंग आवडतो, त्या व्यक्ती अतिशय कलात्मक दृष्टीकोन असलेल्या असतात. ह्या व्यक्ती फारशा बोलक्या नसतात, पण जेव्हा बोलतात, तेव्हा अतिशय मुद्देसूद आणि इतरांना पटेल असे बोलतात. ह्यांच्या आवडी निवडीतून ह्यांचा दृढ आत्मविश्वास दिसून येत असतो. इतरांनी जरी ह्याची कोणती चूक दाखवून दिली, तरी त्याबद्दल मनामध्ये कोणतीही अढी न ठेवता, ह्या व्यक्ती आपली चूक सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करताना दिसतात. इतरांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करणे त्यांना आवडत नाही. आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या अश्या ह्या व्यक्ती असतात. ज्या व्यक्तींना निळा रंग आवडतो, त्या व्यक्ती अतिशय रुबाबदार व्यक्तीमत्वाच्या असतात. ह्यांचा कोणावरही चटकन विश्वास बसत असल्याने, ह्यांचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. कोणताही निर्णय घेताना ह्यांच्या मनाची अवस्था नेहमी दोलायमान असल्याने ह्या व्यक्ती लवकर एखाद्या निर्णयाप्रत पोहोचू शकत नाहीत. ह्या व्यक्ती अतिशय मेहनती, वेळेच्या पाबंद आणि प्रामाणिक असतात.

ज्या व्यक्तींना नारिंगी किंवा केशरी रंग आवडतो, त्या व्यक्ती अतिशय उत्साही असतात. सतत नवीन काहीतरी करून बघणे ह्यांना आवडते. जेव्हा काम करण्याची इच्छा असेल तेव्हा ह्या व्यक्ती अतिशय मेहनत घेतात, आणि आपले काम चोख करतात, पण जर ह्यांचा काम करण्याचा मूड नसेल, तर ह्यांच्याकडून काहीही करवून घेणे अगदी कठीण होऊन बसते. अश्या वेळी दिवसभर आळसात लोळून काढणे हे ह्यांना सहज जमते. मेजवान्या, पार्टीज, मित्रमंडळींसोबत गप्पांचा अड्डा, बाहेर भटकंती हे ह्यांचे आवडते कार्यक्रम असतात. हिरवा रंग आवडणाऱ्या व्यक्ती शांतताप्रिय असतात. ह्यांना कोणत्याही वादविवादाला तोंड देणे आवडत नाही. ह्या व्यक्ती इतरांशी पटकन मैत्री करू शकत नाहीत, पण ह्यांची कोणाशी एकदा मैत्री झाली, की ती मात्र कायमची होते. नवनवीन ठिकाणी भ्रमंती करणे, प्रवास ह्या व्यक्तींना आवडतो. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात ह्या व्यक्ती अतिशय आनंदी असतात. ज्या व्यक्तींना पांढरा रंग आवडतो, ह्या व्यक्ती अतिशय नीटनेटक्या असतात. ह्या व्यक्ती इतरांना गरज भासेल तेव्हा योग्य सल्ला देणाऱ्या असतात. ह्या व्यक्ती भरोश्याच्या आणि सारासार विचार करणाऱ्या असतात. ह्यांचे विचार सहजासहजी बदलत नाहीत.

Leave a Comment