चंबळच्या खोऱ्यातील रहस्यमयी देवळे


चंबळची खोरी म्हटली, की आपल्या डोळ्यांसमोर चंबळ प्रांतातील बंडखोर, दरोडखोर दर्शविणारे अनेक चित्रपट उभे राहतात. ‘बीहड’ म्हटल्या जाणाऱ्या ह्या डोंगरांच्या खोऱ्याखोऱ्यातून वसलेले हे बंडखोर, आसपासच्या गावांमधील सधन व्यक्तींची संपत्ती लुटत असत. सधन सावकारांनी निर्धन लोकांवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्याची ही त्यांची पद्धत होती. चंबळचे खोरे म्हटले, की फुलन देवीची आठवणही हमखास होतेच. फुलन देवीचा आयुष्यपट चित्रपट रूपाने देखील प्रसिद्ध केला आहे. ग्वाल्हेर पासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या ह्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये १९७०-८० च्या दशकांमध्ये सर्वसामान्यांची पाय घालण्याची हिम्मत होत नसे. ह्या ठिकाणी जर चुकून माकून कोणी पोहोचलेच, तर बंडखोरांच्या हाती सापडण्याची शक्यता जास्त असल्याने ह्या भागामध्ये येण्यास लोक घाबरत असत. ह्या भागाची आणखी एक खासियत म्हणजे येथे असणारी देवळे. येथील बंडखोरांच्या प्रमाणे ह्या देवळांचा इतिहासही अनेक रहस्यांनी भरलेला आहे.

बटेश्वर मंदिरे ह्या नावाने ओळखला जाणारा हा सुमारे दोनशे लहान मोठ्या देवळांचा समूह आहे. पंचवीस एकर भूभागावर ही देवळे उभी आहेत. शिवाचे रूप ‘भूतेश्वर’ ह्यावर आधारित ही देवळे, महादेव, शक्ती आणि विष्णूंना समर्पित आहेत. पण ह्या देवळांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पुरातत्ववेत्त्यांच्या आणि इतिहासकारांच्या मते ह्या देवळांचे निर्माण आठव्या आणि दहाव्या शतकाच्या दरम्यान करण्यात आले. गुर्जर-प्रतिहार वंशाच्या अधिपत्याखाली ह्या देवळांचे निर्माण झाले असल्याचे म्हटले जाते. ह्या वंशाचे अधिपत्य नर्मदा नदीच्या तीरापासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पसरलेले असून, त्यांची राजधानी कन्नौज होती. गुर्जर प्रतिहार राज्यकर्त्यांना स्थापत्यशास्त्रामध्ये अतिशय रुची होती.

पण इतर सर्वत्र ठिकाणे सोडून ह्याच विशिष्ट ठिकाणी देवळांचे निर्माण का केले गेले असावे, आणि त्यानंतर हे ठिकाण अचानक उजाड का झाले असावे, ह्यामागील कारणे अजूनही रहस्य आहेत. गुर्जर प्रतिहारांच्या अधिपत्याचा अस्त दहाव्या शतकामध्ये होऊ झाला. त्यानंतर १०१८ साली मेहमूद गझनीने प्रतिहारांची राजधानी कन्नौज काबीज केल्यानंतर प्रतिहारांचा वंश संपूर्णपणे अस्तंगत झाला. पण गझनीच्या अनेक आक्रमणांमुळे बटेश्वर मंदिरांना कोणतेही नुकसान झाले नाही. कालांतराने ही देवळे सुनसान, निर्जन झाल्याने येथे रान माजले. ह्या मंदिरांचा शोध १८८२ साली, ब्रिटीश पुरातत्वावेत्ता आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संस्थापक सर अलेक्झांडर कनिंगहॅम ह्यांना, ते मध्य प्रदेशमध्ये भ्रमंतीसाठी गेलेले असताना लागला. पण तरीही १९२० सालापर्यंत हा देवळांचा समूह दुर्लक्षित राहिला. १९२० साली पुरातत्व खात्याने ह्या देवळांच्या समूहाला ‘हेरीटेज साईट’चा दर्जा दिला. मात्र १९४० पासून ह्या परिसरामध्ये बंडखोरांचे साम्राज्य असल्याने ही देवळे पाहण्यासाठी जाणे म्हणजे आपण होऊन धोका पत्करण्यासारखे होते.

२००२ सालानंतर ह्या परिसरामध्ये बंडखोरांचे अस्तित्व जवळजवळ नष्ट झाल्यानंतर पुरातत्व खात्याच्या वतीने ह्या मंदिरांच्या इतिहासावर अधिक शोधकार्य सुरु झाले. तसेच पडझड झालेल्या अनेक मंदिरांच्या दुरुस्तीचे कार्य देखील ह्याच काळात सुरु केले गेले. आता ह्या परिसरामध्ये बंडखोरांचे अस्तित्व नष्ट झाले असून, बटेश्वर मंदिरांमध्ये शोधकर्ते, अभ्यासक, इतिहासकार ह्यांची वर्दळ सुरु झाली आहे.

Leave a Comment