चार हजार वर्षांपूर्वीचे हे घड्याळ वेळेबरोबर दाखवते भविष्यही


पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी ठराविक काळानंतर ऋतू बदल होत असतो. केवळ भारतातच नाही, तर जगभरामध्ये सर्व ठिकाणी व्यवसाय, लोकांची जीवनशैली ही बदलत्या ऋतूंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. हवामान कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, नेमके कसे असेल, हे सांगणारी अद्ययावत यंत्रणा आजच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध असल्याने निसर्ग कोणते रूप कुठल्या वेळी धारण करणार आहे ह्याचा नेमका अंदाज बांधणे शक्य होते. मात्र काही शतकांपूर्वी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले नव्हते. तेव्हा बदलते ऋतुचक्र आणि हवामान ह्यांचा अंदाज लोक कसा घेत असतील, हा विचार करण्याजोगा विषय आहे.

अगदी अलीकडच्या काळामध्ये अमरिकेतील अॅरीझोना प्रांतातील वेर्डे भागामध्ये असलेल्या कोकोनिनो अभयारण्यामध्ये काही खडकांचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. ह्या खडकांवर चित्रविचित्र चित्रकारी आहे. शास्त्रज्ञ आणि पुरातत्ववेत्त्यांच्या मते, ही चित्रे ऋतुचक्र, वेळ आणि हवामान सूचित करणारी घड्याळे आहेत. शास्त्रज्ञांनी केलेल्या अवलोकनानुसार, सूर्य जेव्हा भूमध्य रेखेच्या जवळून जातो, तेव्हा ह्या खडकांवर पडणारी सूर्याची किरणे पडतानाचे दृश्य अगदी खास आहे.

२००५ सालापूर्वी ह्या खडकांवरील ऋतूचक्र दर्शविणाऱ्या घडयाळाबद्दल कोणालाही कसलीही माहिती नव्हती. २००५ साली केनेथ जाल नामक शोधकर्त्याने पहिल्यांदाच ह्या खडकांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे जवळून, काळजीपूर्वक अवलोकन केले असता, त्याला ह्या ठिकाणी अनेक चिन्हे कोरलेली दृष्टीस पडली. ह्या चिन्हांमध्ये हरीण, सर्प, आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सापडणाऱ्या कोल्ह्यांची चित्रे दिसून आली. त्यानंतर केनेथने ही माहिती पुरातत्व खात्याला दिल्यानंतर त्यांच्यातर्फे काही प्रतिसाद न मिळाल्याने केनेथची निराशा झाली. मात्र गेल्या दशकामध्ये ह्यावर बरच शोधकार्य झाले, आणि त्यावरून प्राचीन काळातील समाजामध्येही अवकाशातील घटनांचे अध्ययन करण्याची परंपरा होती हे सिध्द झाले. तसेच ह्या चिन्हांमध्ये आणखी कोणती रहस्ये लपली आहेत, ह्याचा शोध शास्त्रज्ञ आणि पुरातत्ववेत्ते अजूनही घेत आहेत.

शास्त्रज्ञांनी केलेल्या अवलोकानामध्ये असे दिसून आले, की वर्षातील सर्वात मोठा दिवस, म्हणजे २१ जून रोजी ह्या खडकांवरील अर्ध्याहून अधिक चिन्हांवर सूर्यकिरणे झपाट्याने पसरत होती, तर वर्षातील सर्वात लहान दिवशी सूर्यकिरणे खडकावरील अतिशय छोट्या भागामध्ये पसरली होती. ऋतू बदलत असल्याचे हे संकेत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या मते ह्या प्रांतामध्ये सातव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान सिनागुआ जमातीचे आदिवासी राहत असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. शेतीच्या हंगामाच्या नुसार हे ऋतुचक्र बनविले गेले असावे असे पुरातत्ववेत्त्यांचे मत आहे. केवळ शेतीच नाही, तर निरनिराल्या ऋतुंमध्ये साजरे केले जाणारे धार्मिक सण देखील ह्या कॅलेंडर नुसारच साजरे केले जात असल्याचे तज्ञ म्हणतात.

Leave a Comment