नऊ देशांच्या सीमांवर असणारे जगातील सर्वात निबिड अरण्य


पृथ्वीवरील अनेक प्रांतांमध्ये घनदाट अरण्ये आहेत. काही अतिशय सुंदर, निरनिरळ्या प्रकारच्या चित्रविचित्र वनस्पतींचा खजिना असलेली, तर काही जंगली श्वापदांच्या मुळे कोणालाही पाऊल घालता येणार नाहीत अशी. पण पृथ्वीवर एक जंगल असे ही आहे, जे अतिशय निबिड, भयावह आहे. जे अरण्य आहे अॅमेझॉन रेन फॉरेस्ट. ह्या जंगलामध्ये कोणी गेले आणि वाट चुकले, तर ती व्यक्ती पुन्हा परतण्याची शक्यताच नाही असे म्हणतात. असे म्हटले जाणे जरी आपल्याला विश्वास ठेवण्याजोगे वात नसले, तरी ह्या जंगलाची महती तशी आहे इतके मात्र नक्की.

ह्या जंगलावर अनेक चित्रपट देखील बनविले गेले आहेत. पण ह्या चित्रपटांमध्ये ह्या निबिड, घनदाट अरण्याचा काही हिस्साच मात्र पहावयास मिळत असतो. पण वास्तविक हे जंगल इतके प्रचंड आहे, की ह्याचा विस्तार नऊ देशांच्या सीमांना जोडतो. अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे वर्षावन, म्हणजेच रेन फॉरेस्ट आहे. ह्या जंगलामध्ये अनेक श्वापदे, कीटक, वनस्पती, आणि अनेक चित्रविचित्र जीव जंतू पाहायला मिळतात. पण येथे असणारी तऱ्हे-तऱ्हेच्या जातींची झाडे, वनस्पती ह्या जंगलाची खासियत आहेत. वातावरणातील सुमारे १७ % प्राणवायू केवळ ह्या जंगलातील झाडांमुळे मिळतो अस म्हटले जाते.

अॅमेझॉन रेन फॉरेस्टला अॅमेझोनिया ह्या नावाने देखील ओळखले जाते. दक्षिण अमेरिकेतील ‘अॅमेझॉन बेसिन’ मधील विशाल भूभागावर हे वन विस्तारलेले आहे. रुंद आणि आर्द्र पाने असलेली झाडे असलेले हे वन सत्तर लाख स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरलेले आहे. नऊ देशांच्या सीमांपर्यंत ह्या अरण्याचा विस्तार असून ह्या जंगल सुमारे ५५ मिलियन वर्षे जुने आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या एकूण जीव जन्तुंपैकी सुमारे दहा टक्के जीव जंतू ह्या अरण्यात सापडतात. तसेच दोनशे हून अधिक जातींचे पक्षी ह्या अरण्यात आहेत.

ह्या वर्षावनामध्ये सोळा हजाराहून अधिक प्रजातींची झाडे असून, ह्या अरण्यामध्ये सुमारे ३९० बिलियन झाडे आहेत. हे अरण्य इतके घनदाट, निबिड आहे, की काही ठिकाणी तर दिवसा उजेडी देखील सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ह्या भागांमध्ये दिवसा देखील चांगलाच अंधार असतो.

Leave a Comment