उन्हाळ्यामध्ये थंडी आणि थंडीमध्ये घाम.. असे आहेत संतलाल


गेल्या दोन महिन्यांपासून भारतभर, सर्वच राज्यांमध्ये उकाड्याने कहर केला असून, वाढत्या उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. पण एक वयस्क व्यक्ती अशीही अस्तित्वात आहे, जी इतक्या जीवघेण्या उकड्यामध्ये शेगडी समोर बसून विस्तवाचा शेक घेत असते. इतकेच नाही, तर त्यांना झोपताना इतकी हुडहुडी भरते, की चांगली जाडजूड रजई अंगावर पांघरावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा बाकी सगळे गरम कपडे घालून, शेगडीची ऊब घेत असतात, तेव्हा ह्या माणसाच्या अंगातून मात्र घामाच्या धारा वाहत असतात. उन्हाळ्यामध्ये कडकडून थंडी आणि थंडीच्या दिवसांमध्ये अंगातून घामाच्या धारा वाहणाऱ्या ह्या वयस्क मनुष्याच्या शरीरातील ह्या खास वैशिष्ट्याचे रहस्य आजवर कोणताही डॉक्टर सोडवू शकलेला नाही.

हरियाणा राज्यातील महेंद्रगड जिल्ह्यातील डेरोली अहिर गावामध्ये राहणाऱ्या संतलाल नामक वयस्क माणसाची ही कथा आहे. कडक उन्हामध्ये संतलाल अंगावर पांघरूण घेऊन बसलेले दिसतात, तर कडाक्याच्या थंडीमध्ये थंडगार आईसक्रीमचा आनंद घेताना, बर्फ चघळताना दिसतात. उन्हाळ्यामध्ये थंडी आणि थंडीमध्ये उकाडा अशी आपली अवस्था का होते, हे खुद्द संतराम ह्यांनाही ठाऊक नाही. ग्रामस्थांच्या मते, संतराम अगदी लहान असल्यापासून त्यांची हीच अवस्था आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसजसा दिवस चढत जातो, उकाडा वाढत जातो, तसतशी संतरामना जास्तच थंडी वाजू लागते. सकाळी दहा अकरा वाजण्याच्या सुमारास तर संतरामना शेगडी समोर बसून विस्तवाचा शेक घ्यावा लागतो, इतकी थडी त्यांना वाजत असते.

आपले शरीर ऋतूचक्राच्या विरुद्ध काम करते असे संतराम म्हणतात. थंडीच्या दिवसांमध्ये संतराम उकाड्याने इतके हैराण होतात, की त्यांना सतत बर्फ खावासा वाटतो. त्याशिवाय त्यांना आराम पडत नाही. त्या काळामध्ये त्याच्या अंगाची इतकी लाही लाही होत असते, की दिवसातून किमान तीन चार वेळी कालव्याच्या थंडगार पाण्यामध्ये स्नान केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये संतराम सतत बर्फ खातात, आणि कधी बर्फाच्या लादीवर झोपतातही ! संतराम ह्यांना पहिल्यांदाच भेटणाऱ्या लोकांना त्यांच्या ह्या वागण्याचे अतिशय आश्चर्य वाटत असले, तरी त्यांच्या घरच्या लोकांना आणि इतर ग्रामस्थांना हे सर्व सवयीचे होऊन गेले आहे. असे असूनही, अतिशय साधी राहणी असणारे संतराम कधी आजारी पडल्याचे आठवत नसल्याचे त्यांचे परिवारजन सांगतात.

Leave a Comment