साडे चार महिन्यात विकल्या गेल्या तब्बल १ लाख स्विफ्ट


नवी दिल्ली : खूपच कमी वेळात मारुतीच्या नव्या स्विफ्ट गाडीने प्रेक्षकांची मने जिंकली असून रेकॉर्ड बुकिंगचा आकडा काही दिवसांपूर्वी गाठल्यानंतर मारुती स्विफ्टने आता नवा रेकॉर्ड बनवला आहे. ग्रेटर नोएडात फेब्रुवारी २०१८मध्ये आयोजित ऑटो एक्सपोत मारुती कंपनीने स्विफ्टचे नवे मॉडेल लॉन्च केले होते.

नव्या स्विफ्टने लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही काळातच कारप्रेमींची मने जिंकली. त्यामुळेच ५ महिन्यांपेक्षाही कमी काळात या कारने १ लाख कारची विक्री करत नवा रेकॉर्ड बनवला आहे. अवघे १४५ दिवस (साडे चार महिने) कालावधी स्विफ्ट कारला विक्रीचा हा रेकॉर्ड गाठण्यासाठी लागला. यापूर्वी पहिल्यांदा २००५ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या स्विफ्टच्या देशभरात १.८९ मिलियन (जवळपास १९ लाख कार) कारची विक्री झाली होती. कंपनीने दावा केला आहे की लवकरच विक्रीचा आकडा २० लाखांचा टप्पा गाठेल. आकर्षक डिझाईनमुळे न्यू जनरेशनची स्विफ्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

मारुती कंपनीने यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये स्विफ्टच्या २२,७७६ कारची विक्री करत विक्रीत अव्वल क्रमांक मिळवला होता. स्विफ्टने एप्रिल २०१७ मध्ये ऑल्टो कारला मागे टाकत विक्रीत अव्वल क्रमांक पटकावला होता. मारुती सुजुकी स्विफ्टची १.२ लीटर पेट्रोल मॉडल नवी दिल्लीत ४.९९ लाख रुपये (एक्स शोरुम) उपलब्ध आहे. तर, याचेच बेस १.३ लीटर व्हेरिएंट दिल्लीत ५.९९ लाख रुपये (एक्स शोरुम) किंमतीत उपलब्ध आहे.

Leave a Comment