यूपीएससी उत्कृष्ट रित्या उत्तीर्ण केलेल्या अनु कुमारीच्या वतीने काही टिप्स


हरियाणाची रहिवासी असलेली अनु कुमारी यंदाच्या केंद्रीय सेवा परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने सध्या सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. ह्या स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कोचिंग न घेता अनु कुमारीने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अनु विवाहित असून, तिला चार वर्षांचे अपत्य देखील आहे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून अनुने हे यश मिळविले असल्याने स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांनी, तिने तिचे अनुभव सर्वांना कथन करावेत, परीक्षेची तयारी कशी केली जावी ह्याचे मार्गदर्शन करावे असा आग्रह धरला. त्यांच्या ह्या विनंतीला मान देत अनुने देखील आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपले अनुभव सांगत, स्पर्धा परीक्षेची तयारी कश्या प्रकारे केली जावी ह्या बद्दल काही उपयोगी टिप्स दिल्या आहेत.

तिने स्वतः तयार केलेल्या नोट्सपासून, अभ्यासाच्या पद्धती, रेफरन्स वेबसाईटस्, अभ्यासाच्या दृष्टीने उपयोगी पडणारी पाठ्यपुस्तके, आणि इतरही अनेक मोलाच्या टिप्स अनुने आपल्या ब्लॉगवर शेअर केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनु आपला ब्लॉग नियमितपणे नवनवीन माहितीनिशी ‘अपडेट’ करीत असते. ह्या बाबतीतले वृत्त ‘बेटर इंडिया’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुच्या अभिनव उपक्रमाबद्दल ‘बेटर इंडिया’ने तिचे अभिनंदन करीत तिला तिच्या अभिनव उपक्रमाबद्दल विचारले असता, स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत करण्याची संधी मिळणे ही मोठी समाधानाची बाब असल्याचे अनु म्हणाली.

अनेक मुलांकडे गुणवत्ता असूनही केवळ योग्य साधनांच्या आणि मार्गदर्शनाच्या अभावी स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना मनासारखे यश मिळविता येत नाही, तर अनेक तरुण-तरुणींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कोचिंग ते घेऊ शकत नाहीत. अश्या तरूण तरुणींसाठी आपला ब्लॉग नक्कीच उपयोगी ठरू शकेल असा विश्वास अनुला वाटतो. २०१५ साली केंद्रीय सेवा परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या अर्पिता शुक्लाची मुलाखत पाहून आपल्याला स्पर्धा परीक्षा, कोचिंग शिवाय उत्तीर्ण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अनु सांगते. म्हणूनच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थांना ब्लॉगद्वारे मार्गदर्शन करण्याची कल्पना सुचल्याचे अनु म्हणते.

स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण टिप्स देत अनु म्हणते, अभ्यासासाठी खूप पुस्तके किंवा रेफरन्स मटेरियल वापरण्याऐवजी निवडक मटेरियल वापरावे. त्यामुळे अकारण गोंधळ उडत नाही, आणि वेळेची बचत होते. तसेचा अभ्यासाची पुन्हा पुन्हा उजळणी करणे ही आवश्यक असून, अभ्यासाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे ती म्हणते. एक दिवस दहा तास अभ्यास करायचा आणि पुढच्या दिवशी एकच तास अभ्यास करायचा असल्या सवयी अयोग्य असून, ह्या बाबतीत नियमितता महत्वाची असल्याचे अनु सांगते. स्पर्धा परीक्षांच्या गतकाळातील प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध असून, त्या सोडविणे महत्वाचे आहे, तसेच उत्तरे लिहिण्याचा सराव वारंवार केला जाणे महत्वाचे असल्याचे अनु म्हणते. तसेच परीक्षेमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका वेळेत सोडवून पूर्ण करणे ही महत्वाचे असल्याचे अनु सांगते.

Leave a Comment