या सरकारी गाड्यांना नंबरप्लेट का नाही?


भारतातील प्रत्येक कार वर किंवा इतर कोणत्याही वाहनावर नंबर प्लेट दिसते. किंबहुना प्रत्येक गाडीला नोंदणी क्रमांक असणे कायद्याने बंधनकारक आहे. ह्या रजिस्ट्रेशन क्रमांकावरून, ते वाहन कोणाच्या मालकीचे आहे, ह्याची माहिती मिळू शकते. पण भारत सरकारच्या सेवेतील काही गाड्यांना नंबर प्लेट किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक दिले गलेले नाहीत. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व राज्यांचे राज्यपाल, आणि काही अति महत्वाच्या व्यक्तींसाठी ते वापरीत असलेल्या सरकारी गाड्यांना नंबर प्लेट लावल्या जात नाहीत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार विदेश मंत्रालयाकडेही नंबर प्लेटच्या विना वापरल्या जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत.

सर्वसाधारणपणे ह्या गाड्यांचा वापर, विदेशातून आलेल्या राजकीय पाहुण्यांना नेण्या-आणण्याच्या कामी प्रामुख्याने केला जातो. तसेच राजकीय भेटींच्या निमिताने भारताच्या दौऱ्यावर असणाऱ्या विदेशी राजनेत्यांच्या दिमतीला ह्या गाड्या, त्यांचे भारतामध्ये वास्तव्य असेपर्यंत दिल्या जातात. ही परंपरा ब्रिटीशांचे ज्या काळी भारतावर अधिपत्य होते, तेव्हापासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने, किंवा ह्या गाड्या चटकन ओळखल्या जाऊ नयेत ह्या कारणाकरिता देखील ह्या गाड्यांवर रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स लावल्या जात नाहीत.

ह्या गाड्यांवर नंबर प्लेटच्या ठिकाणी केवळ भारताचे राष्ट्रचिन्ह असलेला अशोक स्तंभ असतो. ह्या, आणि मंत्रीगण, उच्च अधिकारी वापरीत असलेल्या सर्व सरकारी गाड्यांवर लाल बत्ती असे, पण व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने ही लाल बत्ती परंपरा बंद करण्यात आली आहे. विना रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या गाड्या ह्या विशेष व्यक्तींकरिता राखून ठेवण्यात आल्या असून, ती परंपरा देखील व्हीआयपी संस्कृती दर्शविणारी असल्याने हे पद्धत तशीच सुरु ठेवली जावी, की त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावेत ही बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते.