वाईट दुकानदारांच्या जाहिराती फेसबुक करणार बंद!


फेसबुकवर एखादी जाहिरात बघून तुम्ही वस्तू विकत घेतली आणि त्याचा तुम्हाला वाईट अनुभव आला असेल, तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. फेसबुकने एक नवीन साधन आणले असून यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या जाहिराती ओळखता येणार आहेत. ज्या दुकानदारांचा ग्राहकांना वाईट अनुभव आलेला आहे, त्यांच्या जाहिराती बंद करणार असल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे यात फेसबुकच्या वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीचाच वापर करता येणार आहे. मंगळवारपासून फेसबुकवर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यात वापरकर्त्यांनी ज्या व्यावसायिकाकडून खरेदी केली आहे त्यांचे मानांकन करून जाहिरातदारांनी आपली अपेक्षा पूर्ण केली आहे किंवा नाही हे वापरकर्ते इतरांना सांगू शकतात.

“फेसबुकवरील जाहिरातदारांकडून वस्तू विकत घेतलेल्या लोकांशी आम्ही बोललो. आम्ही पाहिलेल्या दोन सर्वाधिक तक्रारी म्हणजे चुकीचे शिपिंग टाईम दाखविणारे किंवा उत्पादनाचे दिशाभूल करणारे वर्णन करणाऱ्या जाहिराती,” असे कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे

ही मूलत: रेटिंगची व्यवस्था आहे. यात वापरकर्ते त्यांच्या अॅड अॅक्टिव्हिटी टॅबवर क्लिक करून, आणि नंतर “फीडबॅक द्या” बटण दाबून जाहिरातींच्या अनुभवाची माहिती देऊ शखतात. वापरकर्त्यांना एका संक्षिप्त प्रश्नावलीची उत्तरे द्यावी लागतील आणि त्यांचा वापर संभाव्य निकृष्ट जाहिरातदार आणि फसवणूक करणारे ओळखण्यासाठी फेसबुक करेल.

“आमच्या दृष्टीने लोक सर्वप्रथम आहेत आणि आम्ही नेहमीच आमच्या जाहिरातींमध्ये सुधारणा करत आहोत. म्हणूनच लोकांनी आम्हाला थेट माहिती द्यावी, यासाठी एक नवीन साधन लॉन्च करत आहोत,” असे फेसबुक प्रॉडक्ट मार्केटिंग डायरेक्टर सारा एप्स यांनी एका ईमेल निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment