डिलिव्हरी बॉयने अशा प्रकारे वाचवले मरणासन व्यक्तीचे प्राण


नवी दिल्ली: घराबाहेरून काही खाद्यपदार्थ मागवल्यानंतर आपली नजर नेहमीच घड्याळाच्या काट्याकडे असते. बऱ्याच वेळा अगदी थोड्या मिनिटांचा उशीर देखील आपल्याला सहन होत नाही आणि त्यात डिलिव्हरीसाठी उशीर झाला तर आपल्या तळ पायाची आग मस्तकाला भिडते. पण चीनमधील एका डिलिव्हरी बॉयच्या शौर्याची कहाणी ऐकल्यावर भविष्यात तुम्ही डिलिव्हरीला उशीर झाल्यास रागावणार नाही एवढे मात्र नक्की.

पीपल्स डेली चायनाने यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनुसार, चीनच्या डिलिव्हरी बॉयने रस्ता चुकलेल्या रुग्णवाहिकेला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाण्यास मदत केली आहे. चीनमधील सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि लोक या डिलिव्हरी बॉयची स्तुती करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी एक रुग्णवाहिका एका गंभीर जखमी व्यक्ती घेऊन जात होती. पण वाटेत रुग्णवाहिका रस्ता भरकटते. रुग्णवाहिकेचे जीपीएस देखील काम करणे थांबवते. ड्रायव्हर रुग्णवाहिका थांबवून डिलिव्हरी बॉयला रस्ता विचारतो.

डिलिव्हरी बॉय रुग्णवाहिकाच्या चालकाला मार्ग स्पष्ट करतो पण रुग्णवाहिका पुन्हा रस्ता भरकटू नये म्हणून आपल्या टू व्हीलरच्या मागे रुग्णवाहिका घेण्यास सांगतो. त्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीने रुग्णवाहिका योग्य ठिकाणी पोहचते. दरम्यान या डिलीव्हरी बॉयचे नाव लू चेंग असे असून आपल्या शौर्यमुळे लू चेंग चीनच्या सोशल मीडियावर हिरो बनला आहे.

Leave a Comment