येतेय २० रुपये किमतीचे नाणे


भारतीय चलनात नव्या नोटांची भर पडत असतानाच आता नव्या नाण्याचा खणखणाट ही लवकरच ऐकू येणार आहे. रिझर्व बँक डिसेंबर मध्ये २० रु. मूल्याची नवी नाणी चलनात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नाण्याचे डिझाईन वेगळे आहेच पण त्याची थीमही वेगळी असेल. दोन धातूंच्या मिश्रणातून ते बनविले जात असून त्याच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आज मितीला भारतीय चलनात २६ हजार कोटी नाणी आहेत. त्यात आता २० रु. नाण्याची भर पडणार आहे. यापूर्वी २० रु. चे नाणे स्मारक नाणे म्हणून काढले गेले होते मात्र नवे नाणे चलनातील वैध नाणे म्हणून चलनात येत आहे. १० रु. नोटांची छपाई मर्यादित स्वरुपात होत आहे तर २० रु. नोटा छपाई बंद केली गेली आहे. सध्या चलनात १० व २० रु. जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात असून त्या फाटक्या, मळलेल्या आहेत. या नोटा लवकरच रिझर्व बँक क्लीन नोट योजनेनुसार परत घेणार आहे.

सध्या चलनात ५ ते २० रु.च्या ८० हजार कोटी रु. मूल्याच्या ५७ अब्ज नोटा आहेत. त्यातील ५० हजार कोटी १० व २० रु. च्या जुन्या नोटाच्या स्वरुपात आहेत. जुन्या नोटा बाद केल्यावर या किमतीच्या नोटा पुरेश्या प्रमाणात चलनात राहाव्यात यासाठी ४० अब्ज नोटा छापाव्या लागतील आणि त्यासाठी ७ ते ८ हजार कोटी रु. खर्च येणार आहे. शिवज या नोटा ५ वर्षानंतर खराब होणार. म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. १० रु. मूल्याची पुरेशी नाणी चलनात आहेत आणि आता २० रु. मूल्याची नाणी चलनात आणली जात आहेत.

Leave a Comment