इंटरनेटविनाही व्हाट्सअप चालू?सुरक्षा दलांना डोकेदुखी


हिंसाग्रस्त आणि अशांत भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्यानंतरही व्हाट्सअप काम करत असल्याचे आढळल्यामुळे भारतीय सुरक्षा संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकार आता अशांत क्षेत्रांमध्ये व्हाट्सअप कॉलिंग सेवेला ब्लॉक करण्याच्या उपायांवर विचार करत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनाने इंटरनेट आणि सोशल मीडिया सेवा नुकत्याच प्रतिबंधित केल्या होत्या. तेव्हा आतंकवादी सीमेपलिकडील आपल्या हँडलरशी सातत्याने संपर्कात होते, अशी माहिती सुरक्षा दलांनी पकडलेल्या अतिरेक्यांकडून मिळाली.

सोमवारी गृह सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक उच्चस्तरीय समितीची बैठक नवी दिल्लीत झाली.

जम्मू-कश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या जैश-ए-मुहम्मदच्या एका अतिरेक्याने दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली नगरौटा येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोर दहशतवाद्यांना सीमेपलिकडून सतत सूचना मिळत होत्या. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला. यावेळी जम्मू-कश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्यानंतरही सीमेपलिकडून पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेशातून सिग्नल कायम राहिल्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यामुळे भारतीय क्षेत्रात व्हाट्सअप कॉलिंग चालू राहते आणि मोबाईलवरून नेहमीप्रमाणे संवाद होऊ शकतो.

Leave a Comment