ही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत?


शरीराचे आरोग्य हे योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यकतेनुसार विश्रांती ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. ह्या सर्वांच्या जोडीने जर ठराविक काळाने मेडिकल चेकअप्स देखील करवीत राहिले, तर आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा धोका संभवत असल्यास, त्याबद्दलही वेळेत जाणून घेऊन त्वरित उपचार सुरु करता येतात. आपले शरीर हे ‘स्मार्ट मशीन’ आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उपन्न होणार असलेल्या व्याधीची लक्षणे, रोग प्रत्यक्ष उद्भवण्याच्या काही काळ आधीच दिसून येऊ लागतात. ह्या लक्षणांकडे जर वेळीच लक्ष देऊन तज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घेतला, तर पुढील धोका टाळला जाऊ शकतो.

जर डोळ्यांच्या आसपास पिवळसर डाग दिसू लागले, तर शरीरामध्ये कोलेस्टेरोलची पातळी वाढली असल्याचे ते लक्षण आहे. ह्या पिवळसर डागांना झँथेलास्मा म्हटले जाते. त्वचेच्या खाली जर अतिरिक्त चरबी साठली असेल, तर हे पिवळसर डाग त्वचेवर दिसून येऊ लागतात. असे डाग दिसून आल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि कोलेस्टेरोलची पातळी वाढलेली असेल, तर आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करून कोलेस्टेरोल कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या भोवती जर काळी वर्तुळे दिसत असली, तर शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नसल्याचे ते लक्षण आहे. तसेच एखाद्या अॅलर्जीमुळे देखील डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येऊ शकतात. जर ही अॅलर्जी असेल, तर काळी वर्तुळे दिसून येण्यासोबत डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे खाजणे अश्या समस्या ही सुरु होतात. त्यामुळे ह्याबाबतीत तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करून घेणे गरजेचे ठरते.

जर तळपायांना सतत खाज सुटत असेल, तर ते फंगल इन्फेक्शनचे लक्ष असू शकते. खाज येण्यासोबत पांढरे ओलसर पुरळ देखील दिसून येऊ शकते. अश्या वेळी तज्ञांच्या सल्ल्याने एखादे चांगले अँटी फंगल क्रीम ही समस्या संपवू शकते. जर ओठांच्या कडांवर भेगा पडत असतील तर हे त्वचा कोरडी असल्याचे लक्षण आहेच, पण त्याशिवाय शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे मिळत नसल्याचेही लक्षण आहे. अश्यावेळी तज्ञांच्या सल्ल्याने ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये वाढवावेत. तसेच आवश्यकता असल्यास ह्या जीवनसत्वांच्या सप्लीमेंट देखील घ्याव्यात. आपल्या आहारामध्ये जीवनसत्वे असावीत ह्या करिता हिरव्या पालेभाज्या, अंडी, लिंबे, संत्री इत्यादी पदार्थ असावेत.
जर अंगाला सतत खाज सुटून पुरळ येत असेल, तर हे फंगल इन्फेक्शन असू शकते. अश्या वेळी अँटी फंगल ट्रीटमेंट घेतल्याने हे पुरळ बरे होते.

पण काही वेळा अंगाला खाज सुटून पुरळ येत असले, तर ही ग्लुटेनची अॅलर्जी असू शकते. अश्यावेळी योग्य त्या तपासण्या करून घेऊन जर ग्लुटेन अॅलर्जी असल्याचे निदान झाले, तर तज्ञांच्या सल्ल्याने आपल्या आहारामध्ये बदल करून ग्लुटेन असलेले पदार्थ वर्ज्य करून त्या ऐवजी अन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्याची आवश्यकता असते. डोक्यावरील केस थोड्या फार प्रमाणात गळणे, ही विशेष काळजी करण्यासारखी बाब नाही. पण जर केस गळतीचे प्रमाण खूप वाढले, तऱ हे शरीरामध्ये लोहाची मात्रा कमी असण्याचे, किंवा थायरॉईड ग्रंथीचे संतुलन बिघडले असण्याचे लक्षण आहे. जर शरीरामध्ये लोहाची मात्रा कमी होत गेली तर त्यामुळे अॅनिमिया उद्भविण्याचा धोका संभवतो. रक्ताच्या तपासणीने ह्या समस्यांचे निदान होऊ शकते. त्यानंतर तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करवून घ्यावेत. तसेच नखे कमकुवत असणे, ती सतत तुटणे हे देखील थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसल्याचे लक्षण आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment