ही आहेत रिव्हर राफ्टींगसाठी भारतातील प्रसिद्ध ठिकाणे


आजकाल मोकळ्या वेळामध्ये नेहमीचे खेळ खेळण्यापेक्षा काही तरी वेगळे, ‘हटके’ करून पाहण्याचा पर्याय आपण सर्वच जण शोधत असतो. म्हणूनच सर्व वयोगटातील उत्साही, काहीतरी थरारक करून पाहण्याची हौस असणाऱ्या मंडळींमध्ये अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स खूपच लोकप्रिय होत आहेत. पॅरा ग्लायडिंग, पॅरा सेलिंग, पॅरा जम्पिंग, गो कार्टिंग ह्या आणि अश्या अनेक थरारक खेळांबरोबर रिव्हर राफ्टींग देखील खूपच लोकप्रिय होत आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणे रिव्हर राफ्टींग करिता प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर दऱ्यांच्या कुशीत लपलेले कोलाड हे ठिकाण रिव्हर राफ्टींग करिता लोकप्रिय ठिकाण आहे. येथे वाहणाऱ्या कुंडलिका नदीचा खळाळता प्रवाह, तीव्र वळणे, आणि अचानक समोर आलेले खोलवरचे ‘ड्रॉप्स’ अतिशय थरारक आहेत. हा रिव्हर राफ्टींगचा प्रवास पंधरा किलोमीटरचा आहे. कुंडलिका नदीला वर्षाचे बाराही महिने पाणी असल्याने वर्षातून कोणत्याही महिन्यामध्ये येथे रिव्हर राफ्टींग केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले हृषिकेश हे ठिकाण देखील रिव्हर राफ्टींग करण्यासाठी ऐत्ष्य प्रसिद्ध आहे. हृषिकेशला गढवाल प्रांताचे ‘ प्रवेशद्वार’ म्हटले जाते. येथे रिव्हर राफ्टींग साठी एक ना दोन, तब्बल तेरा खळाळते ‘रॅपिड्स’, म्हणजे अतिशय वेगवान प्रवाह आहेत. ह्यांची नावे देखील मोठी रोचक आहेत. ‘रिटर्न टू सेंडर’, ‘रोलर कोस्टर’, ‘थ्री ब्लाइन्ड माईस’, अश्या तऱ्हेची नावे असणारे प्रवाह येथे आहेत. कुमाउ पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेल्या ह्या प्रदेशांवर निसर्गाचा वरदहस्त आहे. येथे रिव्हर राफ्टींग करण्यासाठी मार्च ते जून महिन्यांमधील कालावधी उत्तम आहे.

दक्षिण भारतातील कुर्ग हे ठिकाण रिव्हर राफ्टींग करिता प्रसिद्ध आहे. कुर्ग येथील बारापोल नदीचा वेगवान प्रवाह ब्रह्मगिरी अभयारण्यातून वाट काढीत वेगाने पुढे धावत असतो. जे पहिल्या प्रथम राफ्टींग करीत आहेत, त्यांच्यासाठी हा प्रवाह अतिशय सुरक्षित आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान येथे राफ्टींग करता येऊ शकते. तसेच खोल डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये असलेला, डोंगरांवरील बुद्ध विहारांचे विहंगम दृश्य दर्शविणारा इंडस नदीचा ‘ सिंघे खाबाब्स ‘ हा वेगवान प्रवाह रिव्हर राफ्टींगचा थरारक अनुभव देणारा आहे. ह्या प्रवाहाचा उगम तिबेट मध्ये असून, हा प्रवाह लेह लदाख मध्ये वाहतो. जून ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान येथे राफ्टींग करता येते.

आसाम मधील तिस्ता नदीची उपनदी असलेल्या रंगीत नदीमध्ये अतिशय वेगवान प्रवाह आहेत. तसेच ह्या नदीच्या प्रवाहांमध्ये भले मोठे खडकही असून, त्त्यांना चुकवून राफ्टींग करण्याचा अनुभव चित्तथरारक आहे. ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यांच्या दरम्यान येथे राफ्टींग करता येऊ शकते. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील लोहित नदी राफ्टींग करिता प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील प्रवाह साधारण वेगवान असून, जे पहिल्यांदाच राफ्टींग करीत आहेत, त्यांच्यासाठी येथे राफ्टींग करणे अतिशय सुरक्षित आहे. जून ते सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये येथे राफ्टींग करता येऊ शकते.