मराठी भाषा आणि साहित्याला बळ देणार ‘गुगल’


पुणे – प्रादेशिक भाषांचा सोशल मिडियामध्ये वाढता वापर लक्षात घेऊन ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम गुगलने हाती घेतला असून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या प्रकाशक आणि लेखकांना या उपक्रमामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्च संमेलनामध्ये यंदा प्रथमच मराठीचा समावेश करण्यात आला असून, पुण्यात २२ जूनला याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मराठी भाषा आणि साहित्याला गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून सोशल मिडियामध्ये बळ मिळणार आहे.

गुगल सर्च संमेलन गतवर्षी पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. इंग्रजी आणि हिंदी भाषांसाठीचे त्याअंतर्गत संमेलन झाले. यंदा यात हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, तमिळ, बंगाली आणि मराठी या चार प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. गुगल या संमेलनामध्ये या भाषांतील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधणार आहे. प्रादेशिक भाषांतील साहित्य गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून कसे पोहोचवता येईल याचा उहापोह या संमेलनात होईल. पुण्यासह दिल्ली, इंदोर, पाटणा, लखनौ, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोलकाता, कोइमतूर, चेन्नई, बेंगळुरू या शहरांतही संमेलनातील कार्यशाळा होणार आहेत. या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेच्या सदस्यांची निवड गुगलकडून केली जाणार आहे. https://goo.gl/Fsbzuu या लिंकवर कार्यशाळेचा नोंदणी अर्ज उपलब्ध आहे.

Leave a Comment