याहू मेसेंजर होणार बंद, कंपनी देणार नवे अॅप


इन्स्टंट मेसेजिंग अॅपमधील पहिल्या सेवांपैकी एक असलेली याहू मेसेंजर ही सेवा आता बंद होणार आहे. तिला पर्याय म्हणून याहू कंपनी नवीन अॅप आणणार असून सध्याची सेवा बंद झाल्यावर नवीन अॅप वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.

याहू मेसेंजर ही सेवा येत्या 17 जुलै रोजी बंद होणार आहे. या सेवेने गेल्या मार्च महिन्यात 20 वर्षे पूर्ण केली होती. इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय सेवांपैकी एक म्हणून ती काही वर्षांपूर्वी ओळखली जात होती.

ही सेवा बंद झाल्यानंतर वापरकर्त्यांना याहू स्क्विरेल हे नवीन अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र नवीन सेवा बंद झाल्यानंतर वापरकर्त्यांना आपला डाटा डाऊनलोड करून घेण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात येणार आहे, असे दि नेक्स्ट वेब या संकेतस्थळाने म्हटले आहे.

“सध्या तरी याहू मेसेंजरला पर्यायी उत्पादन नाही. नवीन सेवा आणि अॅपची आम्ही सातत्याने चाचणी करत आहोत आणि त्यात याहू स्क्विरेल हे एक आहे. सध्या हे अॅप केवळ आमंत्रितांसाठी आहे आणि सर्वसामान्यांसाठी ते याहू मेसेंजर बंद झाल्यावर उपलब्ध होईल,” असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment