तुरुंगातून पलायनाचे हे आहेत काही रोचक किस्से


कुख्यात गुन्हेगारांनी तुरुंगातून पलायन केल्याचे अनेक किस्से चित्रपटांच्या माध्यामातून आपण पाहिले आहेतच, पण अश्या प्रकारच्या घटना वास्तवात देखील घडत असतात. ह्याबद्दलची वृत्त वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात. अश्याच काही अट्टल गुन्हेगारांच्या पलायनाचे हे काही रोचक किस्से खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

जोसेफ बोलीथो जॉन्स ह्या गुन्हेगाराने तुरुंगातून अनेक वेळा पलायन केले. जॉन्सने सुरुवातीला अगदी लहान सहान वस्तूंची चोरी करून आपल्या गुन्हेगारी कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ब्रेड, चीज, कपडे इत्यादी बारीक सारीक वस्तूंची चोरी करणाऱ्या जॉन्सची भीड लवकरच चेपली आणि त्यानंतर त्याने उत्तम जातीचे घोडे चोरून विकण्यास सुरुवात केली. ह्या गुन्ह्याबद्दल जॉन्सला कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली, पण जॉन्सने तेथून पलायन केले. त्यानंतरही जॉन्सची तुरुंगामध्ये अनेकदा रवानगी झाली, आणि अनेक वेळी त्याने तेथून पलायनही केले. अखेरीस त्याला डांबून ठेवण्यासाठी एक खास कोठडी बनविण्यात आली, आणि ‘आता हिम्मत असेल तर येथून पलायन कर’ असे आव्हान तेथी गव्हर्नर साहेबांनी देऊन टाकले. जर त्या कोठडीतून पलायन करण्यात जॉन्स यशस्वी ठरला, तर त्याचे सगळे गुन्हे माफ करण्यात येतील असे वचनही मोठ्या उत्साहाच्या भरात गव्हर्नरांनी देऊन टाकले. त्यांना त्यांचे वचन लवकरच पूर्ण करावे लागले कारण जॉन्सने ह्या खास कोठडीतून ही यशस्वी पलायन केले.

१९४२ साली काझीमियेर्ज पीशाउस्की, ह्या कैद्याने हिटलरच्या आउसश्वित्झमधील कॉन्सेनट्रेशन कॅम्प मधून, अन्य तीन कैद्यांसह, आपण नाझी अधिकारी आहोत अशी बतावणी करून पलायन केले. पलायन करण्यासाठी ह्या तिघांनी नाझी अधिकाऱ्यांचे गणवेश वापरले आणि त्या अधिकाऱ्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांनी पलायन केले. त्या तिघांना पाहून ते नाझी अधिकारी असावेत अशी गार्ड्सची समजूत झाली, आणि त्यांनी ह्या तिघा कैद्यांना कुठ्ल्याही प्रकारे अडविले नाही. त्यामुळे हे तिघेही सुखरूप निसटले. १९३३ साली जपान मध्ये, खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक झालेला योशी शिरातोरी हा कैदी तुरुंगातून तब्बल चार वेळा पसार झाला. कधी तुरुंगाचे कुलूप तोडून, तर कधी कोठडीच्या छताच्या नजीक असलेल्या लहानशा खिडकीतून, कधी लाकडी जमीन एका पत्र्याच्या तुकड्याने कापून काढून ह्या पठ्ठ्याने तुरुंगातून पलायन केले.

१९५३ साली आल्फ्रेड जॉर्ज हिंडस् ह्या ब्रिटीश कैद्याला दागिन्यांच्या चोरी प्रकरणी शिक्षा होऊन नॉटिंगहॅम येथील तुरुंगात पाठविण्यात आले होते. मात्र कोठडीतून निसटून जाऊन आल्फ्रेडने तुरुंगाची वीस फुट उंचीची भिंत चढून पार करून तुरुंगातून पलायन केले. सुमारे वर्षभर तो पोलिसांपासून लपत राहिला. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. त्याच्या गुन्ह्याची सुनावणी कोर्टात सुरु असताना आल्फ्रेडने बाथरूम मध्ये जाण्याचे निमित्त करून मोठ्या हुशारीने, त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच बाथरूमध्ये कोंडून ठेऊन पुन्हा पलायन केले होते. अगदी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे २०१२ साली, चोई गाप बोक ह्या साऊथ कोरीयन कैद्याने, योगासनाच्या अनेक वर्षांच्या सरावाने लवचिक बनलेल्या शरीराचा फायदा करुन घेत तुरुंगातून पलायन केले. त्यासाठी चोईने आपल्या सर्व शरीरावर खूप तेल लावले, आणि कोठडीमध्ये ज्या लहानशा खिडकीतून कैद्यांना जेवण सरकविले जाते, त्या लहानशा खिडकीतून सरकत जाऊन पलायन केले होते.

Leave a Comment